कोल्हापूर : निवडणूक काळात मत मिळवण्यासाठी सरकारने योजनांचा धडाका लावला होता. मात्र आता याच योजनांचा सरकारी तिजोरीवर आर्थिक भार अधिक झाल्याने इतर खात्यांचा निधी वळता करण्याची दुर्दैवी वेळ राज्य सरकारवर आली आहे. वंचित पीडितांसाठी असलेला सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वापरला. या प्रकारामुळे शिवसेनचे नेते, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त करीत सामाजिक न्याय खात्याची गरज नसेल तर खाते बंद केले तरी चालेल असे सांगत अजित पवार यांना घेरले. अर्थ खात्याचा मनमानी कारभार चालल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे. यासंदर्भात मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले हसन मुश्रीफ ? संजय शिरसाठ हे माझे मित्र आहेत, मात्र त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती. एका ज्येष्ठ नेत्याला असं बोलणं योग्य नाही, असे हसन मुश्रीफ म्हणाले. अजितदादा काय घराकडे पैसे घेऊन जाणार नाहीत. सगळ्या योजनांना पैसे देताना कसरत होत आहे. पण अजितदादांना शकुनीची उपमा देणे चुकीचे आहे. अजितदादा 8 वेळा निवडून आले आहेत. ते 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले आहेत. एवढ्या जेष्ठ नेत्याला असे बोलणे बरोबर नाही, असे मुश्रीफ म्हणाले.अजितदादा काही आकाशातून पैसे आणणार नाहीत. आपण सगळ्यांनी दिलेली आश्वासन पूर्ण करत आहोत. त्यामुळे शिरसाठ यांनी बोलताना विचार करून बोलले पाहिजे, असेही मुश्रीफ म्हणाले.