Eknath Shinde: ठाकरेंनी टाकला डाव? शिंदेंच्या आमदाराची लाचखोरी उघड; थेट व्हिडिओच दाखवला…
Eknath Shinde : व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये सतेज पाटील यांचा हात असल्याचा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांचा आरोप

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एका व्यावसायिकाकडून तब्बल ४० लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला.
यासंदर्भातील पैशांच्या कथित देवाणघेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही इंगवले यांनी केली. तसेच इंगवले यांनी क्षीरसागर यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली आहे.
व्हिडिओमध्ये मध्ये एका शासकीय कामाच्या प्रकरणात संबंधित कंत्राटदार ४० लाख रुपये दिल्याचे सांगत आहे. त्यावर राजेश क्षीरसागर हे त्यास काही कारणावरून खडसावत असल्याचे दिसते. या दोघांतील संवादातून ४० लाख रुपयांची देवघेव झाल्याचे स्पष्ट होते. शिवाय, आणखी काही रक्कम मागितले गेल्याचेही संवादातून पुढे आले आहे.
आमदार राजेश क्षीरसागर यांचा व्हिडिओ व्हायरल करण्यामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा हात असल्याची प्रतिक्रिया आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी दिली आहे.
त्यांनी एक पत्रक काढलं असून, ज्यात कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी हाच व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती, असे सांगितले आहे. तसेच रविकिरण इंगवले हा ब्लॅकमेलर असल्याची टीका ऋतुराज क्षीरसागर यांनी केली आहे.
दरम्यान, शेकाप मधून राजकीय कारकीर्द केलेल्या रविकिरण इंगवले यांनी नंतर आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत शिवसेनेतही काम केले. मात्र काही काळाने या दोघातील मतभेद वाढला. गेल्या काही वर्षात रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांनी केलेल्या भ्रष्टाचार, अन्यायाची अनेक प्रकरणी समोर आणण्याचा प्रयत्न केला. आता इंगवले यांनी एका स्टिंग ऑपरेशनद्वारे राजेश क्षीरसागर यांच्या कथित ४० लाख रुपये प्रकरणाचे उघडकीस आणले आहे.
हेही वाचा :
PMC News: महापालिकेचा अजब कारभार! ४०० हून अधिक जागा रिक्त; तरीही कंत्राटी रक्षकांवर कोटींची उधळपट्टी






