Ajit Pawar: विधानसभेच्या निकालाच्या दिवशी आई काय करत होती? अजित पवारांनी सांगितला घरातील ‘तो’ किस्सा

Ajit Pawar Speech: महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन होऊन मंत्र्यांना खातेवाटप देखील करण्यात आले आहे. सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर बारामतीत परतलेल्या अजित पवारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी विधानसभा निवडणूक निकालाच्या दिवशी घरी नेमके काय घडले? याचा किस्सा सांगितला.
अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत महायुतीचा भाग म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभेत जोरदार फटका बसला असला तरी विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठे यश मिळाल्याचे पाहायला मिळाले. बारामतीतील सत्कार सोहळ्यात बोलताना अजित पवारांनी सांगितले की, सुरुवातीचे निकालाचे कल पाहिल्यानंतर माझी आई देवघरात जाऊन देवाचा जप करत बसली होती.
विधानसभा निकालाच्या दिवशी पोस्टल मतदानामध्ये अजित पवार पिछाडीवर असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. तेव्हा आई म्हणाली की असे कसे झाले. आपण बारामतीत फिरलो आहोत. या वेळी माझी मोठी बहीण आईजवळ होती. तेव्हा आई देवघरात जाऊन जप करत बसली. ‘पांडुरंगा विठ्ठला’ असा देवाचा जप करत होती. त्यानंतर मी एकाला फोन करून माहिती घेतली. त्यावेळी त्याने सांगितले की आपल्याला 60-70 टक्के मते मिळत असून आपण पुढे आहोत, असा किस्सा जाहीर सत्कार सोहळ्यात बोलताना अजित पवारांनी सांगितला.
दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवारांनी महायुतीच्या विजयाचे श्रेय लाडक्या बहिणींना देत त्यांचे आभार मानले. तसेच, ईव्हीवर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर देखील निशाणा साधला.





