अजित पवारांनी ऐकल्या तब्बल ४ हजार तक्रारी; जनसंवाद अभियानाची सुरूवात

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी हडपसर येथे “जनसंवाद” या अभियानाची सुरुवात केली. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना थेट शासकीय यंत्रणेशी संवाद साधण्याची संधी मिळाली. यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स, डिजिटल किऑस्क्स आणि मिस्ड कॉल क्रमांकासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. पारदर्शक तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहोचल्या.
तक्रार नोंदणी, संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचविणे, विभागीय समन्वयातून तोडगा काढणे आणि नियमित फॉलो-अप अशी सुसज्ज यंत्रणा ‘जनसंवाद’मध्ये राबविण्यात आली आहे. नागरी सेवांतील तसेच विविध विभागांच्या कामकाजातील तफावत दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, स्थानिक आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यावेळी उपस्थित होते.
हडपसर येथील कार्यक्रमात तब्बल ३० शासकीय विभाग सहभागी झाले. या ठिकाणी नागरिकांनी ४ हजारांहून अधिक तक्रारी मांडल्या, त्यापैकी १५०० हून अधिक तक्रारींचे निराकरण जागीच करण्यात आले. तक्रारींमध्ये पाणीपुरवठा आणि वाहतूक कोंडीचे मुद्दे विशेषत्वाने मोठ्या प्रमाणावर नोंदविण्यात आले. अजित पवार यांनी सकाळपासून दुपारचे जेवण न घेता, उशिरापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढला.
प्रत्यक्ष संवाद, शासकीय यंत्रणेचा पाठिंबा आणि अत्याधुनिक डिजिटल साधनांचा वापर या त्रिसूत्रीवर आधारित ‘जनसंवाद’ हा पुण्यातील पहिलाच प्रयोग ठरला आहे. या उपक्रमातून नागरिक, शासकीय विभाग आणि राजकीय नेतृत्व एका व्यासपीठावर आले असून, लोकप्रतिनिधी व जनतेतील विश्वासाची वीण अधिक मजबूत झाली आहे.या मोहिमेअंतर्गत नागरिकांना विभागनिहाय डिजिटल किऑस्क्स, व्हॉट्सअॅप चॅटबॉट्स आणि हेल्पलाईन क्रमांकाद्वारे तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक तक्रारीची नोंद करून तिचे नियमानुसार परीक्षण व पाठपुरावा होत असल्याने वेळेवर कारवाई करणे सुलभ झाले आहे.





