अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला; अतुल बेनकेंच्या भेटीवर दोन्ही नेते काय म्हणाले, पाहा…..

Atul Benke । Sharad Pawar । Ajit Pawar: राज्यातील राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेत. प्रत्येक राजकीय पक्षाकडून सर्व मतदारसंघांत चाचपणी केली जात आहे. त्यासाठी राज्यातील बडे नेते राज्यात दौरे करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी आमदार आपल्या भविष्याचा विचार करून आता पक्षात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
त्यातच सध्या अजित पवार यांच्या गटात असणारे आमदार असलेले अतुल बेनके यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल आहे. दरम्यान, या भेटीवर बोलताना त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
याविषयी बोलताना ते म्हणाले, “माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असं मला वाटतं. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे.
सध्या राजकीय स्थित्यंतरं झाली. सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करेन,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पुढे बोलताना त्यांनी, “पक्षप्रवेशाबाबत मला शरद पवार काहीही बोलले नाहीत. मीही त्यांना काहीही बोललो नाही. म्हणूनच पक्षांतराचा प्रश्नच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरं घडली. भविष्यात काहीही होऊ शकतं.
कदाचित शरद पवार, अजित पवार एकत्रही येऊ शकतील. भविष्यातील राजकारणाबाबत सध्यातरी काहीही सांगता येत नाही. मी घड्याळ आणि राष्ट्रवादी पक्षासोबत आहे. पण भविष्यात स्थित्यंतरं घडली तर मी काही सांगू शकत नाही,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
दरम्यान, आता बेनके यांच्या या विधानावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. बेनके हल्ली कोणत्या पक्षात आहेत? मला माहीत नाही. त्यांच्यात आणि माझ्यात काहीच चर्चा झाली नाही. लोक भेटायला येतात.
त्यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा. त्यामुळे भेटलो. साधी गोष्ट आहे की कालच्या लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम केलं तेच लोक आमचे, असं शरद पवार म्हणाले.
मात्र अश्यातच अजित पवार यांनीही बेनके आणि शरद पवार भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. भेट घेतली म्हणून काय झालं? अनेक आमदार माझीही भेट घेतात. बेनके भेटले असतील तर त्यांना विचारा तुम्ही का भेट घेतली? निवडणुकाजवळ आल्यावर काहींना उभं राहायचं असतं.
अमक्या पक्षाला जागा सुटेल, आपल्याला सुटणार नाही, त्यामुळे दुसरीकडे गेलं पाहिजे, असा विचार काही लोक करत असतात. ही लोकं इकडं तिकडं जाणारच. इकडचे तिकडे जातील. तिकडचे इकडे जातील अजून बरेच दिवस आहेत. अजून काय काय झालेलं पाहायला मिळेल, असं अजित पवार म्हणाले.





