तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा दिला इशारा

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
नेमके काय म्हणाले तानाजी सावंत?
मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी माझं जमलेलं नाही. शिक्षण घेत असल्यापासून आत्तापर्यंत कधीही यांच्याशी जमलं नाही. हे वास्तव आहे. आज जरी कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ते सहन होत नाही असे वक्तव्य तानाजी सावंत यांनी केले.
तानाजी सावंताच्या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार पलटवार केलाय. तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली आहे.तानाजी सावंत यांच्या या वक्तव्याने महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.





