प्रभात वृत्तसेवा वडगाव मावळ – निवडणुकीत मिळालेल्या विजयाने हुरळून जाऊ नका, लोकांनी तुम्हाला सेवा करण्यासाठी निवडून दिले आहे. चुकीचे काम केले तर तुमची आणि पक्षाची बदनामी होते. त्यामुळे चुकीच्या गोष्टींना अजिबात थारा देऊ नका, अशी सक्त ताकीद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना दिली. जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेसमध्ये लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद तसेच वडगाव मावळ नगरपंचायतीतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सन्मान व पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, विठ्ठलराव शिंदे, गणेश ढोरे, शंकरराव शेळके, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, सुरेश चौधरी, कृष्णाजी कारके, अशोक भेगडे, विलासराव काळोखे, अतुल वायकर आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, शहराच्या विकासासाठी पहिल्या १०० दिवसांचा कृतीआराखडा तयार करा. स्वच्छता, पिण्याचे पाणी, भुयारी गटारे व घनकचरा व्यवस्थापनावर भर द्यावा. पक्षभेद न करता सर्वसामान्य जनतेसाठी काम करावे. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, भुयारी गटार आणि घनकचरा व्यवस्थापन याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले. सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी तर आभार विठ्ठल शिंदे यांनी मानले.