Maval Bazar Samiti : मावळ बाजार समितीचा फैसला आता ‘चिठ्ठी’वर! १३ जण इच्छुक, कोणाचं नशीब उजळणार?
Maval Bazar Samiti : सभापती आणि उपसभापती पदासाठी इच्छुकांची मांदियाळी; एकमत न झाल्याने अखेर 'लॉटरी' पद्धतीने होणार निवड.

Maval Bazar Samiti – मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी आज महत्त्वपूर्ण घडामोडी घडणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडीकडे लागले आहे. इच्छुकांची मोठी संख्या आणि त्यातून निर्माण झालेला पेच यामुळे यंदाची निवड प्रक्रिया विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. तब्बल १३ संचालक या पदांसाठी इच्छुक असल्याने अखेर लॉटरी पद्धतीने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, कोणाचे नशीब उजळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मावळ बाजार समितीचे विद्यमान सभापती संभाजी शिंदे आणि उपसभापती नामदेव शेलार यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्यानंतर ही दोन्ही पदे रिक्त झाली. त्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या पार्श्वभूमीवर सहायक निबंधक तथा अध्यासी अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडणार आहे.वडगाव मावळ येथील सहायक निबंधक कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल.
त्यानंतर आवश्यकतेनुसार मतदान किंवा एकमताने निवड, अथवा लॉटरीच्या माध्यमातून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. दोन वर्षांचा उर्वरित कार्यकाळ लक्षात घेता, जास्तीत जास्त संचालकांना संधी मिळावी, असा विचार पुढे आला आहे. यासाठी सर्व इच्छुकांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न झाले, मात्र ठोस तोडगा न निघाल्याने अखेर लॉटरी हा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. या पद्धतीनुसार इच्छुकांची नावे चिठ्ठ्यांवर लिहून त्यातून सोडत काढण्यात येणार आहे.
त्यातून निवडलेले नाव सभापती किंवा उपसभापती पदासाठी निश्चित केले जाईल. या प्रक्रियेमुळे निर्णयात पारदर्शकता राहील, असा दावा करण्यात येत असला तरी ही पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे.या निवडीबाबत मावळ तालुक्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. पारंपरिक निवड प्रक्रियेऐवजी लॉटरीद्वारे पदाधिकारी निश्चित होणार असल्याने नागरिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. राजकीय वर्तुळातही या निर्णयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात असून भविष्यातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
इच्छुकांची मोठ्या संख्येमुळे चुरशीची लढत
बाजार समितीच्या संचालक मंडळात एकूण १६ सदस्य असून त्यामध्ये अनेक अनुभवी आणि प्रभावी नेत्यांचा समावेश आहे. सुभाष जाधव, ॲड. भरत ऊर्फ साहेबराव टकले, मारुती वाळुंज, दिलीप ढोरे, विलास मालपोटे, शिवाजी असवले, बंडू घोजगे, विक्रम कलवडे, अमोल मोकाशी, साईनाथ मांडेकर, नथुराम वाघमारे, नामदेव कोंडे, विलास मानकर, शंकर ऊर्फ बाळासाहेब वाजे, सुप्रिया मालपोटे आणि अंजली जांभुळकर या सदस्यांपैकी १३ जणांनी पदासाठी इच्छा व्यक्त केल्याने निवड प्रक्रियेत अनपेक्षित वळण आले आहे.
सामान्यतः अशा निवडींमध्ये एकमत किंवा गटनेतृत्वाच्या आधारावर निर्णय घेतला जातो. मात्र, यावेळी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कोणत्याही एका नावावर एकमत होणे कठीण ठरले आहे. त्यामुळे वातावरणात राजकीय चुरस निर्माण झाली असून प्रत्येक इच्छुक आपली संधी साधण्याच्या प्रयत्नात आहे.




