Ajit Pawar : जिल्हा बँकेत मोठी भरती! अजित पवारांचा संचालकांना सख्त इशारा ; म्हणाले ‘जर गडबड झाली तर…’

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्हा मध्यवर्ती बॅंकेमध्ये लवकरच लेखनिक, शिपाई आणि वाहनचालक आदी १ हजार ८० पदांसाठी भरती होणार आहे. ही भरती करताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यासाठी शक्य असेल, तेवढी मदत करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच भरती करताना काही गडबड झाल्याचे कानावर आले, तर माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला दिला.
जिल्हा बँकेच्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पवार बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, कृषीमंत्री आणि संचालक दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील ,माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई उपस्थित होते. यावेळी पवार यांनी गेल्या आर्थिक वर्षात बँकेने केलेली कामगिरी, संचालक मंडळाच्या कारभाराचे कौतुक केले.
यावेळी पवार म्हणाले की, बँकेत विविध पदांची भरती होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीनशेहून अधिक जागांची भरती झाली आहे. लवकरच पावणेचारशे जागांची भरती होणार आहे. या भरतीसाठी सहकार खाते, नाबार्ड आणि रिझर्व्ह बँकेने काही निकष ठरवून दिले आहेत. त्यानुसार ही भरती होणार आहे. भरती करताना जिल्ह्यातील सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देता येईल, यासाठी प्रयत्न करू..
एका जिल्हा बँकेच्या भरतीतील गैरप्रकाराचा उदाहरण देताना पवार म्हमाले की, एका बॅंकेत भरतीचा दर २५ लाख रुपये ठरला होता. अशा प्रकारांमध्ये सर्वसामान्य घरातील नागरिक भरडले जातात. असे प्रकार सहन करणार नाही. लोकांनी आपल्याला निवडून दिलेले आहे. जर भरतीमध्ये काही गडबड केल्याचे कानावर आले, तर मी खपूवून घेणार नाही, कोणालाही माफ करणार नाही.
यावेळी दिवाळी बोनस म्हणून केडर सचिवांची २५ हजारांची मागणी पवार यांनी मान्य केली. तसा ठराव संचालक मंडळाच्या बैठकीत करण्याच्या सूचना देऊन ते म्हणाले, तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज घेणाऱ्यांची संख्या जवळपास २ लाख ८८ हजार आहे. त्याच्या व्याजाचा हिस्सा केंद्र, राज्य आणि काही हिस्सा बँक उचलते. त्यासाठी नऊ कोटी रुपयांचा बोजा बँकेवर येतो. ही रक्कम पाच लाख रुपये केल्यास अवघ्या २४०० सभासदांना फायदा होईल, परंतु त्यापोटी नऊ कोटी रुपयांनी बँकेवर आणखी बोजा वाढेल. त्यामुळे हे करणे शक्य नाही.
चुकीचे होऊ देणार नाही..
मी जरी बॅंकेत संचालक नसलो तरी जिल्हा बॅंकेच्या कारभाराकडे बारकाईने लक्ष आहे. तुमच्या बँकेत चुकीचे काही होऊ देणार नाही. जो पर्यंत मी धडधाकड आहे. तो पर्यंत बॅंकेत माझे लक्ष राहणार आहे. तसेच चांगल्या कामांसाठी मी पाठीशी उभा राहीन, असेही पवार म्हणाले.




