Jammu-Kashmir Election: अजित पवारांची थेट जम्मू-काश्मीरमध्ये उडी; 25 स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

Jammu-Kashmir election । Ajit Pawar – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर आतापासूनच राजकारण तापू लागले आहे. दुसरीकडे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी अजित पवार गटाने जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे.
अजित पवारांनी जम्मू काश्मीर निवडणुकीची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्यावर सोपवली आहे. श्रीवास्तव यांनी जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी पक्षाच्या 25 स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आहे.
श्रीवास्तव हे जम्मू-काश्मीरचे पक्षाचे प्रभारी आहेत. श्रीवास्तव यांनी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत पक्षाच्या 25 नेत्यांचा समावेश केला आहे. हे नेते जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाचा प्रचार करणार आहेत.
यामध्ये उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य एस. आर. कोहली आणि जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल यांच्यासह कार्यकारिणी सदस्य पार्थ पवार यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपला विस्तार करण्याचे निश्चित केले आहे. त्याची सुरुवात काश्मीरपासून केली जात आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी जुलै महिन्यात आठ दिवसांचा काश्मीर दौरा केला होता.
यामध्ये त्यांनी इच्छूक उमेदवारांची चाचपणी केली होती. त्यासोबतच पक्षाचे ध्येय धोरण, जम्मू-काश्मीरच्या विकासाबाबत पक्षाचे व्हिजन याबद्दल कार्यकर्त्यांना माहिती दिली होती. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष डॉ. तारिक रसूल होते.





