PBKS vs KKR : ‘काय फालतू फलंदाजी…’, पराभवानंतर श्रेयसशी बोलतानाचा अजिंक्यचा VIDEO व्हायरल

PBKS vs KKR Ajinkya Rahane video viral in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील ३१ वा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. ज्यामध्ये पंजाब किंग्जने आपल्या छोट्या धावसंख्येचा जबरदस्त बचाव करताना १६ धावांनी शानदार विजय मिळवला. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना कोलकाताच्या समोर ११२ धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात केकेआरचा संघ ९५ धावांत गारद झाला. यानंतर अजिंक्य रहाणेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
या सामन्यात एका वेळेस अजिंक्य रहाणे आणि अंगक्रिश रघुवंशी क्रीजवर होते, तेव्हा कोलकाता नाईट रायडर्सची धावसंख्या २/६२ होती आणि त्यांना विजयासाठी ७५ चेंडूत ५० धावांची आवश्यकता होती. पंजाब किंग्ज अजूनही या धावसंख्येचे रक्षण करेल असे कोण म्हणू शकले नसते? पण पंजाबने असे करुन दाखवताना इतिहास रचला. मंगळवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात कोलकाताचे शेवटचे ८ फलंदाज ३३ धावांच्या आत बाद झाले आणि पंजाबने १६ धावांनी सामना जिंकला.
अजिंक्य रहाणेचा व्हिडीओ व्हायरल –
Was watching the #PBKSvKKR game and caught this funny bit as Shreyas and Rahane shook hands at the end. In a self-deprecating way Rahane appears to be saying to Shreyas in Marathi : काय फालतू बॅटिंग केली ना आम्ही (We played terrible, didn’t we) 😂😂 pic.twitter.com/bNkC7TXGbU
— निखिल घाणेकर (Nikhil Ghanekar) (@NGhanekar) April 15, 2025
आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने बचाव केलेली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या पराभवामुळे निराश झालेल्या केकेआर कर्णधार अजिंक्य रहाणेचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सामन्यानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरसमोर येताच मराठीत बोलताना दिसला. या दोघांतील संवादाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘काय फालतू फलंदाजी केली ना आम्ही.’ हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा – Zaheer Sagarika Baby : झहीर-सागरिकाच्या घरी आठ वर्षांनंतर हालला पाळणा, ‘हे’ ठेवलं मुलाच नाव
सामन्यानंतर अजिंक्य रहाणेने पराभवाची जबाबदारी घेतली आणि तो बाद झाल्यानंतरच सामना वेगळ्या दिशेने जाऊ लागला असे सांगितले. केकेआर संघाच्या फलंदाजीबद्दल तो म्हणाला, “आम्ही फलंदाजी युनिट म्हणून खूप वाईट फलंदाजी केली, गोलंदाजांनी पंजाबच्या मजबूत फलंदाजी लाइन अपविरुद्ध खरोखरच चांगली कामगिरी केली. मला वाटते की, आम्ही निष्काळजी होतो, एक युनिट म्हणून आम्ही संपूर्ण जबाबदारी घ्यायला हवी होती.”





