Aiden Markram : ICC पुरस्कारावर एडेन मारक्रमची मोहर, WTC फायनलमधील कामगिरीला सलाम!
Updated On:

Aiden Markram Win ICC Player of the Month Awards : दक्षिण आफ्रिकेचा दमदार फलंदाज एडेन मारक्रमला जून 2025 साठी आयसीसीचा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या शानदार कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. या सामन्यात मारक्रम ‘प्लेयर ऑफ द मॅच’ ठरला होता. त्यानी दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा आणि श्रीलंकेचा सलामीवीर पथुम निस्सांका यांना मागे टाकत हा पुरस्कार मिळवला.
WTC फायनलमध्ये केली होती शानदार कामगिरी –
30 वर्षीय सलामीवीर एडेन मारक्रमने WTC फायनलमध्ये 207 चेंडूंमध्ये 136 धावांची खणखणीत साकारली. कर्णधार टेंबा बावुमा यांच्यासोबत त्याने तिसऱ्या गड्यासाठी 147 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे दक्षिण आफ्रिकेला 282 धावांचे लक्ष्य यशस्वीपणे गाठता आले. यामुळे दक्षिण आफ्रिकेने 1998 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रथमच आयसीसीचे विजेतेपद पटकावले. मारक्रमने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीमध्येही योगदान दिले. त्याने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
A match-winning ton in the #WTC25 Final earns Aiden Markram the ICC Men’s Player of the Month for June 🏆
Read More ➡️ https://t.co/d2mZczToK3 pic.twitter.com/SI51dCuhAA
— ICC (@ICC) July 14, 2025
हेली मॅथ्यूजने चौथ्यांदा जिंकला पुरस्कार –
महिला गटात वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानावरील अप्रतिम कामगिरीनंतर चौथ्यांदा ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जिंकला. यापूर्वी तिने नोव्हेंबर 2021, ऑक्टोबर 2023 आणि एप्रिल 2024 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेच्या ताजमिन ब्रिट्स आणि वेस्ट इंडिजच्या एफी फ्लेचर यांना मागे टाकले.
हेही वाचा – IND vs ENG : अखेर रवींद्र जडेजाची झुंज ठरली अपयशी! चुरशीच्या सामन्यात इंग्लंडने मारली बाजी
त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या अॅश्ले गार्डनर नंतर हा पुरस्कार चार वेळा जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली. हेली मॅथ्यूजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 104 धावा केल्या, ज्यात तिसऱ्या सामन्यातील अर्धशतकाचाही समावेश आहे. तसेच, तिने मालिकेत चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर टी-२० मालिकेतही शानदार कामगिरी सुरू ठेवली. दोन अर्धशतकांसह तिने एकूण 147 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेत ‘प्लेयर ऑफ द सीरीज’ ठरली.





