अहमदनगर – सुपा बस स्थानकाची ईडापिडा टळणार

पारनेर -तालुक्यातील सुपा शहरात असलेल्या एसटी महामंडळाच्या बसस्थानकाची ईडा पिडा लवकरच जाणार असून या बसस्थानक सुशोभीकरणासाठी सुमारे अडीच कोटी निधी मंजूर झाला आहे. खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या संदर्भात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नगर येथे बैठक बोलविण्यात आली. सुपा या ठिकाणी लोकांच्या सुखसुविधेसाठी व सोईसाठी कशापद्धतीने प्लॅन बसवता येईल, या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार संग्राम जगताप, पारनेर तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंदे पाटील, सरपंच योगेश रोकडे, माजी उपसरपंच दत्तात्रय पवार, अधिकारी, इंजिनिअर दरेकर यांच्याशी चर्चा करून खासदार विखे पाटील यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सुपा बसस्थानकाची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, जागेअभावी लांब पल्ल्याच्या गाड्या रस्त्यावरच थांबतात. गाड्या रस्त्यावर थांबल्याने अनेक वेळा अपघात झाले आहेत.





