बाहेरगावचे कुत्रे पारनेरमध्ये सोडले

पारनेर – पारनेर बसस्थानक परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून गळ्यात पट्टे असलेले भटके कुत्रे कळपाने दिसून येत असल्याने बसस्थानक परिसरात लहान मुले, महिला, वृध्द यांना भितीदायक वातावरण तयार झाले आहे. कोणीतरी अज्ञाताने पारनेर शहरात हे भटके कुत्रे सोडल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. हे भटके कुत्रे या आधी या परिसरात कधीच पाहिले नव्हते, असे स्थानिक नागरिक सांगत आहेत. या भटक्या कुत्र्यांना पारनेर शहरात कोणी आणून सोडले, याचा शोध लागणे आवश्यक आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीक करत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी पारनेर शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगर पंचायतचे नगरसेवक योगेश मते यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीचा आढावा घेऊननगर पंचायतने काही कर्मचारी यांचेमार्फत शहरातील बसस्थानक चौक, हिंद चौक, बाजारतळ, जामगाव रोड, लोणी रोड तसेच शहरातील बहुतांश भागांतील या भटक्या कुत्र्यांना बंदिस्त करून तालुक्याच्या बाहेर पन्नास साठ किलोमीटर सोडून देण्यात आले.
प्रश्न असा पडतो की पारनेर शहरातील हे भटके कुत्रे पकडले मग हे नवीन कुत्रे आले कुठून व हे नवीन पट्टेदार कुत्रे पारनेर शहरात आणून कोणी सोडले. पारनेर शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही तपासले तर कुत्रे सोडणाऱ्यांचा शोध लागू शकतो. संबधित विभागाने शहरातील भटके कुत्रे सोडणाऱ्यांचा तपास लावून त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरीक करत आहेत.





