पारनेर नगरपंचायतीला गणेश विसर्जनाचा विसर दीड दिवसानंतरचे गणपती विसर्जन कुठे करायचे?

पारनेर – पारनेर शहरात गणेश मंडळासह घरगुती गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे . या सर्व गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पारनेर नगर पंचायत दरवर्षी तयारी करत असते. यापूर्वी नगर पंचायतीने गणेश उत्सवाच्या दोन दिवस अगोदरच विसर्जन करण्यात येणाऱ्या बारवेची स्वच्छता करण्यात आली परंतु यावेळी बारव व परिसरातील स्वच्छतेचा विसर प्रशासनाला पडला आहे.
गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवसानंतर घरगुती गणपतीचे विसर्जन सुरू होते. शहरात त्याचे व्यवस्थापन नगरपंचायतीच्या वतीने केले जाते मात्र असे असताना शहरातील बारवेकडे नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या बारवेजवळ अस्वच्छता झाली आहे. बारवेची कसल्याही प्रकारची स्वच्छता केली गेलेली नाही त्यामुळे पारनेर शहरातील गणेश भक्तांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. या बारवेची तत्काळ स्वच्छता करण्याची मागणी शहरातील गणेश भक्त करत आहेत.
गणेश मूर्तीचे विसर्जन परंपरागत शहरातील वरची वेस येथील बारवेत करण्यात येते. नगर पंचायत प्रशासन दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधीच या बारवेची स्वच्छता करत असतात,मात्र यंदा नगर पंचायतला या बारवेच्या स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. दोन दिवसांपूर्वीच नगर पंचायत विविध समितीच्या सभापतींची निवड करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधक या बैठकीला उपस्थित होते परंतु येणाऱ्या गणेश उत्सवात गणेश विसर्जन करण्यासाठी असलेली बारव स्वच्छता करण्याचा प्रशासन व नगरसेवक यांना प्रश्न उमगला नाही, हे विशेष आहे. शहरातील गणेशभक्त या नगर पंचायत प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. या समस्येची तत्काळ दखल घेऊन बारवेची स्वच्छता करण्याची मागणी जोर धरत आहे.





