Nilesh Lanke : म्हसणे फाटा बनला ‘अपघात केंद्र’; खासदार निलेश लंके यांनी केली सिग्नल बसवण्याची मागणी

प्रभात वृत्तसेवा
पारनेर – अहिल्यानगर–पुणे महामार्ग हा जिल्ह्यातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग ठरत असून, या मार्गावरील म्हसणे फाटा परिसर गंभीर वाहतूक समस्येचा केंद्रबिंदू बनला आहे. दररोज हजारो वाहनांची वर्दळ, नियंत्रणाची कमतरता आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वाहतूक सिग्नल बसविण्याची मागणी केली आहे.अहिल्यानगर–पुणे हा केवळ जिल्ह्याचाच नव्हे तर राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे.
या महामार्गावर म्हसणे फाटा हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागाशी ग्रामीण भागाला जोडणारे प्रमुख चौक आहे. दररोज सकाळ, संध्याकाळच्या गर्दीच्यावेळी येथे वाहनांची संख्या काही हजारांच्या घरात असते. मात्र, सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीचे नियंत्रण पूर्णतः कोलमडले आहे. अनेकदा चार दिशांतून वाहने एकाच वेळी रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. या चौकातून अनेक शाळा आणि महाविद्यालयांकडे जाणारी वाहतूक होते.
त्यामुळे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण झाला आहे. वाहनांच्या वेगामुळे आणि सिग्नल नसल्याने पादचारी अपघातांच्या घटना वाढण्याची शक्यता वाढली आहे. “नागरिकांना सुरक्षितता देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असे नमूद करत खासदार लंके यांनी या ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्याची गरज ‘तातडीची आणि अपरिहार्य’ असल्याचे अधोरेखित केले आहे.
बांधकाम विभागाला खा. लंके यांचे पत्र..
या विषयावर खासदार नरलेश लंके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. पत्रात म्हटले आहे की, “अहिल्यानगर–पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक नियमनासाठी सिग्नल बसविण्याची आवश्यकता आहे. स्थानिक पोलीस विभाग आणि आपल्या विभागामार्फत संयुक्त समन्वयातून तातडीने निर्णय घ्यावा.तसेच, सदर प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करून अहवाल सादर करावा, अशी अपेक्षा त्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.




