Ahmedabad plane crash : विमान अपघातामुळे विमा कंपन्यांना बसला मोठा फटका !

Air India । Ahmedabad plane crash : अहमदाबाद येथे गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या भीषण अपघातानंतर आता त्याच्या इन्शुरन्स क्लेमची रक्कम 1 हजार कोटींच्या घरात गेली आहे. ऍव्हिएशन सेक्टरमधील हा आतापर्यंतच सर्वात महागडा इन्शुरन्स क्लेम आहे. संपूर्ण देशातील ऍव्हिएशन सेक्टरच्या एकूण वार्षिक प्रीमियमपेक्षा ही रक्कम जास्त आहे.
एअर इंडियाची मालकी असलेल्या टाटा ग्रुपने या अपघातातील मृत प्रवाशांच्या प्रत्येक कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अशात असा अंदाज आहे की, इन्शुरन्स क्लेम 1 हजार कोटींपर्यंत जाऊ शकतो. याचा ऍव्हिएशन इन्शुरन्स इंडस्ट्रीवर मोठा फरक पडू शकतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांच्या वारसाला 1999 च्या मॉन्ट्रियल करारांतर्गत भरपाई दिली पाहिजे. म्हणजेच, मृतांच्या वारसाला 1,28,821 एसडीआर (स्पेशल ड्रॉईंग राइट्स) एवढी रक्कम द्यायला हवी. सध्याच्या दरांनुसार ही रक्कम प्रति प्रवासी 1.4 कोटी एवढी होते आहे.
सध्या एक एसडीआरची किंमत 120 रुपये आहे. ही रक्कम अमेरिकन डॉलर, यूरो, चीनी रॅन्मिन्बी, जपानी येन आणि ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग – या पाच जागतिक चलनावर आधारित आहे. अर्थात, एअर इंडियाने आपल्या प्रवाशांसाठी कितीचा विमा काढला होता, यावरच अंतिम रकमेचा निर्णय केला जाईल.
मॉन्ट्रियल कन्व्हेन्शन हा एक करार आहे, ज्या अंतर्गत हवाई प्रवासाशी संबंधित विविध मुद्द्यांसाठी एक कायदेशीर चौकट आखून देण्यात आली आहे. जी प्रवाशांच्या हिताची आहे. या अंतर्गत, जर विमान कंपनीमुळे एखाद्या प्रवाशाचे नुकसान झाले असेल तर त्यांना त्याची भरपाई देणे बंधनकारक आहे. भारताने 2009 मध्ये हा करार स्वीकारला होता.





