सना, (येमेन) – येमेनचे परराष्ट्र मंत्री अहमद अवाद बिन मुबारक यांना अचानक देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इस्रायलने गाझावर केल्या जात असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून येमेनमधील हौथी गटांनी लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले सुरू केल्यामुळे अमेरिका आणि ब्रिटनने येमेनमधील काही भागांवर हल्ले करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे येमेनसंदर्भात तणाव निर्माण झाला आहे. लाल समुद्रातील हा तणाव वाढल्यामुळे बिन मुबारक यांना माईन अब्दुलमालिक सईद यांच्या जागेवर पंतप्रधान नियुक्त करण्यात आले आहे. येमेनच्या अध्यक्षीय नेतृत्व परिषदेने मुबारक यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. माजी पंतप्रधान सईद यांना अध्यक्षांचे सल्लागाराचे पद देण्यात आले आहे. येमेनच्या अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र ही अदला बदल का करण्यात आली, याचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. नव्याने नियुक्त झालेले पंतप्रधान मुबारक हे पूर्वी अमेरिकेमध्ये येमेनचे राजदूत होते. हौथी बंडखोरांच्या कारवायांवर ते कडाडून टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. येमेनमध्ये २०१५ मध्ये पहिल्यांदा तत्कालिन अध्यक्ष अब्बू- रब्बू- मन्सूर हदी यांच्या कार्यकाळात झालेल्या सत्तासंघर्षाच्यावेळी मुबारक पहिल्यांदा चर्चेत आले होते. मुबारक तेंव्हा अध्यक्षांचे चीफ ऑफ स्टाफ होते आणि हौथी बंडखोरांनी त्यांचे अपहरण केले होते. या अपहरण नाट्यामुळे येमेनमधील आघाडी सरकारमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. हौथी आणि हदी यांच्या पक्षातील मतभेदांमुळे हदी यांना अध्यक्ष म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर २०१८ मध्ये मुबारक यांना संयुक्त राष्ट्रामध्ये येमेनचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले गेले होते.