Ahilyadevi Holkar Jayanti : श्रीक्षेत्र चौंडीत अहिल्यादेवी होळकरांना अभिवादन; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती
Ahilyadevi Holkar Jayanti : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे भव्य सोहळा; लोककल्याणकारी आणि दूरदर्शी प्रशासनाचा मान्यवरांकडून गौरव.

Ahilyadevi Holkar Jayanti – लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त श्रीक्षेत्र चौंडी (ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य जयंती उत्सवात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपस्थित राहून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या श्रीक्षेत्र चौंडी येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात जयंती उत्सव साजरा केला जातो. यंदा त्यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त राज्यभरातून हजारो भाविक, समाजबांधव आणि नागरिकांनी उपस्थिती लावली होती. संपूर्ण परिसर भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदर्शी प्रशासनाचा गौरव केला. समाजातील सर्व घटकांना समान न्याय देत त्यांनी आदर्श राज्यकारभार उभा केला.
तसेच देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार, घाट, विहिरी आणि धर्मशाळांची उभारणी करून त्यांनी समाजसेवेचा अनोखा आदर्श निर्माण केल्याचे मान्यवरांनी नमूद केले.या कार्यक्रमासाठी इंदापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. तसेच तालुक्यातील हजारो नागरिकांनी चौंडी येथे उपस्थित राहून लोकमाता अहिल्यादेवींना अभिवादन केले. विविध सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा जागर करण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा उत्सव शांतता, उत्साह आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. राज्याच्या कानाकोपर्यातून आलेल्या नागरिकांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली.





