Pune Accident : पुण्यात टँकरचा थरार थांबेना! पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
Pune Accident : पुणे शहर परिसरात टँकरच्या अपघातांचे सत्र सुरूच; वानवडी, हडपसर आणि कोंढव्यानंतर आता लोणीकंदमध्ये भीषण अपघात.
Updated On:

Pune Accident – पुणे-अहिल्यानगर रस्ता परिसरात पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दत्तात्रय मोहन पंडीत ( ४७, रा. ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता ) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पंडीत यांचा चुलतभाऊ रविराज ( २६) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्तात्रय पंडीत ८ मे रोजी रात्री तुळापूर फाटा परिसरातून निघाले होते. त्यावेळी पाणी वाहतूक करणाऱ्या टँकरने धडक दिली.
गंभीर जखमी झालेल्या पंडीत याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक तुकाराम सुरवसे तपास करत आहेत. शहर परिसरात मागील महिनाभरापासून भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. वानवडी भागात टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाला होता.
हडपसरमधील महंदमवाडी परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुण, तसेच बिबवेवाडी –कोंढवा रस्त्यावर दुचाकीस्वार हाॅटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी टँकर चालक मालकांची बैठक घेऊन त्यांना वाहतूक नियमांचे पालन, तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.





