Indapur News – इंदापूर शहराची ओळख केवळ विकासकामांपुरती मर्यादित नसून येथील समृद्ध धार्मिक परंपरा आणि संस्कृतीमुळे ती अधिक दृढ झाली आहे. शंभू महादेवाच्या कावडीची परंपरा ही शहरातील श्रद्धा, एकात्मता आणि सेवाभावाचे प्रतीक आहे,” असे गौरवोद्गार इंदापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी काढले. इंदापूर शहरातील मानाची समजली जाणारी कांबळे बंधूंची कावड शिखर शिंगणापूरकडे (जि. सातारा) प्रस्थान करण्यापूर्वी नगराध्यक्ष भरत शहा यांच्या हस्ते मानाची आरती संपन्न झाली. यावेळी नगर परिषदेचे गटनेते शकील सय्यद, स्थानिक नगरसेवक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष शहा म्हणाले की, “आजच्या आधुनिक काळातही युवक मोठ्या उत्साहाने या परंपरेत सहभागी होत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. समाजातील सर्व घटक तरूण, ज्येष्ठ आणि व्यापारी या सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येत असल्याने सामाजिक ऐक्य अधिक मजबूत होत आहे. श्रद्धा, सेवा आणि संस्कृती या त्रिसूत्रीवर आधारलेला हा सोहळा पुढील पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.” दरवर्षीप्रमाणे यंदाही इंदापूर शहरातून मोठ्या संख्येने कावडी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मार्गस्थ होत आहेत. यामध्ये सुनील नामदेव कांबळे यांच्या नेतृत्वाखालील कांबळे बंधूंची कावड भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. ही कावड सोमवारी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर देवस्थानात पोहोचणार आहे. कावडीला कापड चढवण्याच्या विधीपासूनच शहरात उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येक गल्लीबोळात होणारा ‘हर हर महादेव’चा जयघोष, ठिकठिकाणी होणारे कावडीचे स्वागत आणि भाविकांकडून ओवाळण्यात येणाऱ्या आरत्यांमुळे संपूर्ण इंदापूर शहर भक्तीरंगात रंगून गेले आहे.