Indapur News – इंदापूर तालुक्यातील शेतकरी अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत असून, एका बाजूला बाजारभावाची घसरण तर दुसऱ्या बाजूला साखर कारखान्याकडे अडकलेले उसाचे पैसे यामुळे शेतकरी अक्षरशः कोंडीत सापडला आहे. गहू, कांदा, भाजीपाला, ऊस यांसारख्या प्रमुख पिकांना समाधानकारक दर मिळत नसल्याने आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आता अधिक बिकट झाली आहे. यातच भर म्हणजे तालुक्यातील एका सहकारी साखर कारखान्याने कारखाना खाजगी कंपनीकडे चालविण्यास दिल्यानंतर उसाचे पैसे मोठ्या प्रमाणावर थकले आहेत. सुरुवातीला वेळेवर बिल मिळेल या आशेने घेतलेला निर्णय आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लाखो रुपयांचे थकबाकीचे रक्कम कारखान्याकडे अडकून पडल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. पूर्वी सहकारी व्यवस्थेत संचालक मंडळाशी थेट संवाद साधता येत होता. मात्र आता कारखाना खाजगी व्यवस्थापनाकडे गेल्याने “तक्रार करायची तरी कुणाकडे?” असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. खाजगी मालकांपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. या संदर्भात शेतकरी संघटनांनी साखर क्षेत्राशी संबंधित विभागांकडे तक्रारी दाखल केल्या असल्या तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची मालिका सुरू असून, प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलेले नाही, अशी भावना व्यक्त होत आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे या दुहेरी संकटाचा परिणाम सामाजिक स्तरावरही दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न घटल्याने कुटुंबांवर आर्थिक ताण वाढला असून, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा भागवताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात बेरोजगारी आणि स्थलांतराचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजकीय पातळीवरही हा मुद्दा चांगलाच तापला असून, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा न काढल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे. एकूणच, बाजारभावातील घसरण आणि उसाचे अडकलेले पेमेंट या दुहेरी फटक्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतीव्यवस्था डळमळीत झाली असून, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने ठोस व प्रभावी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषिमंत्री भरणे यांच्याकडून अपेक्षित असलेली कार्यवाही आता कितपत आणि किती वेगाने होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे. शेती खर्चात वाढ,मात्र उत्पन्न कमी मागील काही महिन्यांपासून खत, बियाणे, कीटकनाशके तसेच मजुरी दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतीचा खर्च प्रचंड वाढला असताना, उत्पादन विक्रीच्या वेळी मिळणारा दर अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. भाजीपाला उत्पादकांना तर मोठा फटका बसला असून, टोमॅटो, वांगी, भेंडी यांसारख्या पिकांना दर कमी मिळत असल्याने वाहतूक खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पिके शेतातच नांगरून टाकण्याचा निर्णय घेतल्याचे चित्रही दिसत आहे. कृषिमंत्र्यांकडून शेतकर्यांना अपेक्षा इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी तसेच राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. तालुक्याचे प्रतिनिधित्व राज्याच्या कृषी खात्यात असल्याने शासनाच्या माध्यमातून काहीतरी भरीव निर्णय होईल आणि अडकलेले पैसे तसेच बाजारभावाचा प्रश्न मार्गी लागेल,” अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहेत.