Agricultural News : गहू उत्पादक शेतकरी संकटात! इंदापूर-बारामतीत ‘तांबेरा’चा विळखा; उत्पादनात घटीची शक्यता
Agricultural News : थंडीचा कडाका कमी झाल्यामुळे गव्हाच्या वाढीवर विपरीत परिणाम; लांबी घटली आणि दाणेही पोसले नसल्याने शेतकरी अडचणीत.

Agricultural News – इंदापूर आणि बारामती परिसरात वातावरणातील बदल आणि थंडीचा कडाका कमी झाल्यामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. काही भागांत गव्हाची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी ‘तांबेरा’ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यावर्षी वातावरणात गारवा कमी राहिल्याने गहू पिकावर विपरीत परिणाम झाला आहे. उशिरा झालेल्या पेरण्यांमुळे गव्हाला आवश्यक असणारा थंडीचा कालावधी मिळाला नाही.
परिणामी, गव्हाच्या लोंब्यांची लांबी कमी राहिली असून दाणेही पोसले गेलेले नाहीत. त्यातच अनेक ठिकाणी तांबेरा रोगाची लागण झाल्याने पीक धोक्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऊस तुटल्यानंतर उशिराने गव्हाची पेरणी केली, त्यांना या हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसत आहे.शेतकऱ्यांच्या मते, काही भागांमध्ये गव्हाचे पीक चांगल्या स्थितीत आले असून उतारा देखील समाधानकारक मिळणार आहे.
मात्र, ज्या भागांमध्ये पेरणी उशिरा झाली किंवा थंडी कमी राहिली, तिथे गव्हाचे उत्पादन कमी राहणार आहे. तसेच तांबेरा रोगामुळे उत्पादनात घट होण्याची भीती आहे. पिकाची स्थिती चांगली असल्यास एकरी १५-१६ पोती उत्पन्न व्हायचे त्या तुलनेत यंदा पिकाची विरळ उगवण आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे हे उत्पादन एकरी ८ ते ९ पोत्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
एका बाजूला काही भागात पीक समाधानकारक असले तरी, बहुतांश भागात उत्पादनात निम्म्याने घट होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात कपात होणार आहे. सततची निसर्गाची अवकृपा आणि पिकांवरील रोगांमुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून, उत्पन्नाचे गणित जुळवताना त्याची दमछाक होत असल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.





