भारतासोबतचा करार लवकरच ! डोनाल्ड ट्रम्प यांचे महत्वाचे संकेत

वॉशिंग्टन – भारतासोबतचा व्यापार करार अंतिम टप्प्याच्या खूप जवळ आला आहे. तसेच आपल्या प्रशासनाने अनेक देशांना पत्रे पाठवण्यास सुरुवात केली आहे ज्यात त्यांना आयात केलेल्या उत्पादनांवर लादल्या जाणाऱ्या शुल्काची माहिती दिली आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आम्ही ब्रिटनशी करार केला आहे, आम्ही चीनशी करार केला आहे आणि आम्ही भारताशी करार करण्याच्या जवळ आहोत. आम्ही इतर लोकांशीही भेटलो आणि आम्हाला वाटत नाही की आम्ही त्या देशांशी करार करू शकू, म्हणून आम्ही त्यांना पत्र पाठवले आहे.
जर तुम्हाला तुमचा माल अमेरिकेला पाठवायचा असेल तर तुम्हाला शुल्क भरावे लागेल. भारत आणि अमेरिकेतील व्यापार करार जवळजवळ पूर्ण झाला आहे आणि अंतिम करार लवकरच जाहीर केला जाऊ शकतो असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
१ ऑगस्टपर्यंत मुदत
अमेरिकी प्रशासनाने 2 जुलैपासून लादलेल्या उच्च आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाची मुदत ९ जुलैवरून आता १ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. यामुळे भारताला अमेरिकेसोबत व्यापार करार अंतिम करण्यासाठी अतिरिक्त 3 आठवडे मिळाले आहेत.
भारताचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की भारत कोणत्याही मुदतीच्या आधारावर व्यापार करार करत नाही आणि जेव्हा तो करार पूर्णपणे अंतिम होईल, योग्यरित्या पूर्ण होईल आणि राष्ट्रीय हिताचा असेल तेव्हाच तो स्वीकारेल.
अमेरिकेने या देशांना पत्रे पाठवली
ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेले पत्र बांगलादेश, बोस्निया आणि हर्जेगोविना, कंबोडिया, इंडोनेशिया, जपान, कझाकिस्तान, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, मलेशिया, सर्बिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, थायलंड आणि ट्युनिशिया यांना पाठवण्यात आले आहेत.
ट्रम्प म्हणाले, हे देश अमेरिकेला लुटत आहेत आणि आपल्यावर असे शुल्क लादत आहेत जे यापूर्वी कोणीही लावले नाहीत. काही देश असे आहेत जे २०० टक्के शुल्क लादत आहेत आणि व्यापार अशक्य करत आहेत.
या पत्रांमध्ये असे म्हटले आहे की १ ऑगस्टपासून दक्षिण कोरिया आणि जपानमधून होणाऱ्या आयातीवर २५% कर लादला जाईल. ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर या निर्णयाची माहिती देखील शेअर केली.
ट्रम्प यांचा इशारा
त्यांनी हे देखील स्पष्ट केले की जर हे देश अमेरिकेतच उत्पादने बनवत असतील तर त्यांच्यावर कोणतेही शुल्क लादले जाणार नाही. त्यांनी असा इशारा देखील दिला की जर या देशांनी अमेरिकेवर टॅरिफ वाढवले तर अमेरिका देखील त्याच प्रमाणात टॅरिफ वाढवेल.
हा निर्णय एप्रिलमध्ये जाहीर केलेल्या लिबरेशन डे टॅरिफ धोरणाचा विस्तार आहे. जपानवर आधीच २४% आणि दक्षिण कोरियावर २५% शुल्क लादण्यात आले आहे. हे टॅरिफ अमेरिकेने १०० वर्षांत लादलेले सर्वोच्च शुल्क आहेत.





