Agniveer Yojana : जवानांच्या हौतात्म्यानंतर भेदभाव कशासाठी? अग्निवीर योजनेवर राहुल गांधींनी उपस्थित केले गंभीर प्रश्नचिन्ह

Agniveer Yojana – नाशिकमध्ये प्रशिक्षणावेळी दोन अग्निवीरांच्या मृत्यूची दु:खदायक घटना घडली. ती घटना अग्निपथ योजनेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. त्याचे उत्तर देण्यास केंद्र सरकार अयशस्वी ठरले आहे, असे टीकास्त्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सोडले.
नाशिकमध्ये अग्निवीरांच्या प्रशिक्षणावेळी तोफेचा गोळा अचानकपणे फुटला. त्या दुर्घटनेत दोन अग्निवीर मृत्युमुखी पडले. त्यावरून राहुल यांनी केंद्र सरकारला घेरले. शहीद जवानांच्या कुटूंबीयांना भरपाई दिली जाते. तेवढीच भरपाई मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीरांच्या कुटूंबीयांना वेळेत उपलब्ध होईल का?
अग्निवीरांच्या कुटूंबीयांना पेन्शन आणि इतर सरकारी सुविधांचा लाभ का मिळू नये? अग्निवीर आणि इतर जवानांच्या जबाबदाऱ्या, बलिदान यांच्यात कुठला फरक नाही. मग, त्यांच्या हौतात्म्यानंतर भेदभाव कशासाठी? अग्निपथ योजना लष्करासाठी अन्याय आहे.
तसेच, वीर जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणारी आहे. एका जवानाचे आयुष्य दुसऱ्या जवानाच्या आयुष्यापेक्षा मौल्यवान कसे याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी द्यायला हवे, अशी मागणी राहुल यांनी सोशल मीडियावरून केली.
एकत्र मिळून अन्यायाविरोधात उभे राहू. केंद्र सरकारची अग्निपथ योजना हटवण्यासाठी, तरूणांचे आणि लष्कराचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आमच्या जय जवान आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी जनतेला उद्देशून केले.





