पीओकेमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; एक पोलीस ठार, १०० जखमी

इस्लामाबाद – पाक व्याप्त काश्मीरमध्ये भडकलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून हिंसाचारामध्ये एक पोलीस कर्मचारी ठार झाला असून किंमान १०० जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांमध्ये बहुसंख्य पोलीस कर्मचारी आहेत. गव्हाच्या पिठाच्या प्रचंड वाढलेल्या किंमती आणि वीज बिलाच्या विरोधात लोकांनी हे आंदोलन सुरू केले असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
आंदोलन चिरडण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस आणि सुरक्षा दलांना या भागात तैनात केले गेले आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये शनिवारी जोरदार संघर्ष झाला. संपूर्ण पाक व्याप्त काश्मीरमध्ये चक्का-जाम आंदोलन केले गेले होते.
आंदोलकांनी इस्लामगडपासून मुजफ्फराबादेपर्यंत लॉंगमार्चचे आयोजन केले होते. जम्मू काश्मीर जॉइंट आवामी ऍक्शन कमिटीने काढलेला हा लॉंगमार्च कोटली मार्गे पूंछ जिल्ह्यात जाणार होता.
या मोर्चाला अडवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला गेला होता. मात्र इस्लामगड येथे आंदोलकांमधून झालेल्या गोळीबारात एक पोलीस निरीक्षक ठार झाला. तर रहान गल्ली भागातल्या हिंसाचारात पोलीस उपाधिक्षक आणि महसूल विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह ५९ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त जखमी झालेल्या ९ आंदोलकांनाही रुग्णालयात नेण्यात आले आहे.
जेएएसीच्या आंदोलनामध्ये स्थानिक व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जलविद्युत उत्पादन दरांनुसार वीजबिलांची आकारणी व्हावी, गव्हाच्या पीठावर अनुदान मिळावे आणि प्रतिष्ठितांना मिळणारी विशेष सुविधा रद्द करण्यात यावी, अशी स्थानिकांची प्रमुख मागणी आहे.
या आंदोलनाची दखल घेऊन पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी आपल्या निवासस्थानी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. हा तणाव कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचे प्रस्ताव त्यांनी संबंधितांकडून मागवले आहेत.
आंदोलन चिरडण्याची सरकारची तयारी…
या प्रचंड आंदोलनाला चिरडण्यासाठी प्रांतीय सरकारने पाक रेंजर्सना पाचारण केले आहे. पीओकेच्या भिंबेर आणि बाग टाऊन यासारख्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा देखील खंडीत करण्यात आली आहे.
मीरपूरमध्ये मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट खंडीत करण्यात आले आहे. बुधवारी आणि गुरुवारी जेएएसीच्या ७० नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अनेक नेत्यांच्या घरांवर छापेही घालण्यात आले आहेत.





