आयफोन-अँड्राइड यूजर्सकडून प्रवासासाठी वेगवेगळं भाडं? आता Ola-Uber ने दिले स्पष्टीकरण

Ola-Uber News: कॅब अॅग्रीगेटर प्लॅटफॉर्म ओला आणि उबर हे स्मार्टफोनच्या आधारावर प्रवाशांकडून वेगवेगळे भाडे आकारात असल्याची तक्रार समोर आली होती. यावर केंद्र सरकारच्या कंझ्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीकडून (CCPA) कंपन्यांना नोटीस बजावत स्पष्टीकरण मागण्यात आले होते. आता यावर कंपन्यांनी उत्तर देत प्रवाशांकडून डिव्हाइसच्या आधारावर अतिरिक्त भाडे आकारण्यात येत नसल्याचे म्हटले आहे.
ओला आणि उबरकडून अँड्राइड आणि आयफोन यूजर्सकडून वेगवेगळे भाडे आकारण्यात येत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर व्यवहार मंत्रालयाच्या कंज्यूमर प्रॉटेक्शन अथॉरिटीकडून कंपन्यांना नोटीस बजावत ग्राहकांना वेगवेगळे शुल्क का दाखवले जाते, याचे कारण विचारले होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही एक्सवर (ट्विटर) याबाबतची माहिती दिली होती. त्यानंतर कंपन्यांनी या नोटीसवर उत्तर दिले आहे.
या नोटीसला उत्तर देत ओलाचे प्रवक्ते म्हणाले की, ‘आमच्याकडे सर्व ग्राहकांसाठी देशाl एक किंमत रचना आहे. आम्ही यूजर्सला ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर एकाच प्रवासासाठी वेगवेगळ्या किंमती दर्शवत नाही. याबाबत सीसीपीएला माहिती देण्यात आली असून, शंका दूर करण्यासाठी काम केले जात आहे.’
उबरचे प्रवक्ते याबाबत बोलताना म्हणाले की, ‘आम्ही फोनच्या आधारावर प्रवासाचे भाडे ठरवत नाही. आम्ही ही शंका दूर करण्यासाठी CCPA सोबत मिळून काम करत आहोत.’ दरम्यान, या प्रकरणात अद्याप अॅपल आणि गुगलकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.




