प्रभात वृत्तसेवा पुणे – एअरपोर्ट परिसरातील ॲरोमॉलमधील रॅपिडो कंपनीच्या ऑफिसमध्ये घडलेल्या एका नाट्यमय प्रकाराने महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. कंपनीतील बावीस वर्षी तरुणीने दोन व्यक्ती व त्यांच्या साथीदारांविरुद्ध धमकी आणि जबरदस्तीने व्हिडिओ शूट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत विमानतळ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी प्रतिस्पर्धी ओला आणि उबेर कंपनीचे कर्मचारी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, ती रॅपिडो कंपनीमध्ये समन्वयक (कोऑर्डिनेटर) म्हणून मागील दोन महिन्यांपासून कार्यरत आहे. तिचे ऑफिस एअरमॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. ती १७ ऑक्टोबर रोजी दुपारी कार्यालयात असताना अचानक कृष्णा जाधव नावाचा त्याचा एक मित्र आणि दोन पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये आले. त्यांनी रॅपिडो कंपनीविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून चौकशीच्या नावाखाली लॅपटॉप तपासला. कंपनी ऑनलाइन काम करत असून, मुख्य कार्यालय औंध येथे आहे. यामुळे पोलिसांनी फिर्यादीला सहकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. यानंतर कृष्णा जाधव याने पोलिसांनी सांगितले आहे, माझ्या गाडीतून फिर्यादी व तिच्या महिला सहकाऱ्याला घेऊन येतो. यामुळे अंमलदार त्यांच्या दुचाकीवरून पुढे गेले. त्यानंतर आरोपींनी दोघींना जबरदस्तीने गाडीत बसविण्याचा प्रयत्न करत तुमचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकू, बदनामी करू, तुमचे करिअर संपवू, अशी धमकी दिली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, कृष्णा जाधवसोबत अंबादास होंडे आणि केशव क्षीरसागर हे उपस्थित होते. त्यांनी मोबाइल फोनवरून फिर्यादी आणि तिच्या सहकाऱ्यांचा व्हिडिओ काढला. या घटनेमुळे ती आणि तिचे सहकारी मानसिक तणावाखाली आले. तक्रारीच्या आधारे तपास सुरू आहे. संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जात असून, सर्व घटनाक्रमाचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत. – विठ्ठल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक