Pratap Sarnaik : ओला-उबरला टक्कर देणार सरकारचं स्वतःचं ‘छावा राईड’ ॲप; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई : ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवा कंपन्यांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी आणि स्थानिक मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने छावा राईड ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली. या ॲपद्वारे रिक्षा, टॅक्सी आणि बस तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बैठकीत अंतिम मसुद्यावर चर्चा
मंत्रालयातील परिवहन मंत्र्यांच्या दालनात केंद्र आणि राज्य सरकारच्या ॲग्रीगेटेड पॉलिसी(समुच्चयक धोरण) अंतर्गत यात्री ॲपच्या अंतिम मसुद्यावर चर्चा झाली. या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या ॲपच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रवाशांना परवडणारी आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे.
मराठी तरुणांना रोजगार आणि आर्थिक पाठबळ
छावा राईड ॲपच्या माध्यमातून राज्यातील मराठी तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. विशेष म्हणजे, वाहन खरेदीसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या तरुणांना मुंबई बँकेकडून कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यामुळे स्वतःचे वाहन घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, मुंबई बँकेमार्फत वाहन खरेदीसाठी १० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होईल. याशिवाय, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटके विमुक्त महामंडळ, ओबीसी महामंडळ आणि एमएसडीसी यांच्यामार्फत ११ टक्के व्याज परताव्याचे अनुदान दिले जाणार आहे. यामुळे कर्ज जवळपास बिनव्याजी होईल, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.
छावा राईड ॲप
या ॲपसाठी जय महाराष्ट्र, महा-राईड, महा-यात्रीआणि छावा राईड अशा नावांचा विचार झाला. सर्वानुमते छावा राईड हे नाव निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेनंतर हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी पावले उचलली जातील, असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
खासगी कंपन्यांना पर्याय आणि स्थानिकांना संधी
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, छावा राईड ॲपचा मुख्य उद्देश खासगी टॅक्सी सेवा कंपन्यांच्या मक्तेदारीला पर्याय देणे आणि स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. एसटी महामंडळ या ॲपचे संचालन करणार असून, लवकरच याची अंमलबजावणी सुरू होईल. या उपक्रमामुळे मराठी तरुण-तरुणींना स्वावलंबी होण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई बँकेचा पुढाकार
मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी आश्वासन दिले की, बेरोजगार मराठी तरुण-तरुणींना वाहन खरेदीसाठी विशेष आर्थिक पाठबळ दिले जाईल. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन स्थानिक तरुणांना आर्थिक स्थैर्य मिळेल. हा उपक्रम महाराष्ट्रातील वाहतूक क्षेत्रात क्रांती आणण्यासोबतच स्थानिक तरुणांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.





