‘भारत टॅक्सी’ देणार ओला-उबरला टक्कर; पहिल्या टप्प्यात ४ राज्यांमध्ये सुरूवात
Bharat Taxi | केंद्रीय सहकार विभागाच्या पुढाकाराने देशात पहिल्यांदाच सहकारी तत्त्वावर ‘भारत टॅक्सी’ सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. ओला आणि उबरला आव्हान देण्यासाठी बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात ही सेवा सुरू केली जाणार आहे.
ओला, उबर यांसारख्या खासगी कंपन्यांकडून टॅक्सी चालकांची होणारी आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी तसेच सामान्यांना किफायतशीर दरात टॅक्सी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना आणली जात असल्याची माहिती राष्ट्रीय सहकार विकास महामंडळातील सुत्रांनी दिली आहे.
‘भारत टॅक्सी’ ही ॲप आधारित टॅक्सी सेवा
दरम्यान, गेल्या महिन्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार धोरणाची घोषणा करताना सहकारमंत्री अमित शहा यांनी डिसेंबरपूर्वी देशात सहकारी तत्त्वावर ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ‘भारत टॅक्सी’ ही ॲप आधारित टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे.
राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ, भारतीय कृषी फर्टिलायझर सहकारी संस्था लि., गुजरात सहकारी दुग्ध विकास संस्था यांसह आठ सहकारी संस्थांच्या सहभागातून “बहुराज्य सहकारी टॅक्सी सेवा संस्था” स्थापन करण्यात आली आहे. Bharat Taxi |
३०० कोटींचे भांडवल उभारणार
या प्रकल्पासाठी ३०० कोटींचे भांडवल उभारण्यात येणार आहे. यात थेट सरकारचा सहभाग नसणार आहे. भारतीय कृषक सहकारी संस्था, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामिण विकास बँक, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि राष्ट्रीय सहकार निर्यात यादेखील संस्था सहकारी टॅक्सी संस्थेच्या भागधारक असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सेवा सुरू केली जाणार असून टप्प्याटप्प्यानं देशभरात सेवा सुरू होईल. त्यासाठी आतापर्यंत २०० टॅक्सी चालकांची नोंदणी करण्यात आली आहे. Bharat Taxi |
हेही वाचा :
“न्यायालयाने शुल्काविरुद्ध निर्णय देऊ नये…” ; डोनाल्ड ट्रम्पकडून महामंदीचा इशारा





