#CWC23 #SLvBAN : श्रीलंकेविरूध्दच्या विजयानंतर बांगलादेशला मोठा धक्का; शाकिब अल हसन…

Shakib Al Hasan Ruled Out From World Cup 2023 : बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन 2023 च्या विश्वचषकातून बाहेर झाला आहे. स्पर्धेतील दुसऱ्या विजयानंतर बांगलादेशसाठी हा मोठा धक्का आहे. शाकिबच्या नेतृत्वाखालील बांगलादेशने सोमवारी (06 नोव्हेंबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर श्रीलंकेचा 3 गडी राखून पराभव केला. पण याच सामन्यात शाकिबच्या डाव्या हाताच्या तर्जनीला (index finger of left hand) दुखापत झाली, त्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
बॉल आणि बॅटने अप्रतिम कामगिरी करत शाकिबने श्रीलंकेविरुद्ध सामनावीराचा किताब पटकावला. पहिल्यादा गोलंदाजीत त्याने 2 बळी घेतले. यानंतर फलंदाजीत 280 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 65 चेंडूत 126.15 च्या स्ट्राईक रेटने 82 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. मात्र, शाकिबची चमकदार कामगिरी ही फार उशीरा पहायला मिळाली, कारण त्याच्या संघाचे स्पर्धेतून आव्हान याआधीच संपुष्टात आलं आहे.
त्याच्या बोटाच्या दुखापतीबद्दल सांगायचे झाले तर, रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेविरुद्धच्या मॅचनंतर शाकिबचा एक्स-रे करण्यात आला, ज्यामध्ये फ्रॅक्चर आढळले. बांगलादेशचे फिजिओ बायजेदुल इस्लाम म्हणाले की, शाकिबला श्रीलंकेविरुद्धच्या डावाच्या सुरुवातीला दुखापत झाली होती, परंतु त्याने वेदनाशामक आणि सपोर्टिंग टेपच्या मदतीने फलंदाजी सुरू ठेवली.
विश्वचषकात शाकिबची कामगिरी…
विश्वचषकात श्रीलंकेविरुद्धच्या खेळीशिवाय शाकिबकडून कोणतीही विशेष कामगिरी झालेली नाही. बांगलादेशी कर्णधाराने 7 सामन्यात केवळ 26.57 च्या सरासरीने 186 धावा केल्या आहेत. याशिवाय गोलंदाजीत त्याने केवळ 5 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, बांगलादेश शनिवारी, 11 नोव्हेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्पर्धेतील 9वा आणि शेवटचा साखळी सामना खेळणार आहे. बांगलादेशने आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्या पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत.






