Shakib Al Hasan : बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनच्या गोलंदाजीच्या अॅक्शनला ‘क्लीन चिट’

ढाका : बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब अल हसनच्या गोलंदाजीच्या अॅक्शनला ‘क्लीन चिट’ मिळाली असल्याने तो मैदानात पुन्हा मैदानात परतू शकेल. शाकिब आता जगभरातील एकदिवसीय सामने आणि लीगमध्ये खेळू शकतो. शाकिबने कसोटी आणि टी-२० प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.
क्रिकबझशी बोलताना शाकीबने गोलंदाजी चाचणीत उत्तीर्ण झालो असल्याचे सांगताना पुन्हा बॉलिंग करण्याचा आनंद घेवू शकतो असे सांगितले. मात्र त्याने त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनचा तिसरी चाचणी कुठे केली हे उघड केले नाही. तो शेवटचा भारताविरुद्ध ऑक्टोबर २०२४ मध्ये कानपूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, इंग्लिश काउंटी सरेकडून खेळताना, त्याच्या बॉलिंग अॅक्शनची तक्रार करण्यात आल्यानंतर ती बेकायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले होते.
यानंतर, जानेवारीमध्ये चेन्नईमध्ये शाकिबची चाचणी घेण्यात आली होती, परंतु त्याची अॅक्शन कायदेशीर असल्याचे घोषित करण्यात आले नव्हते. या कारणामुळे त्याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर राहावे लागले. बांगलादेशला आता श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळायची आहे, ज्यामध्ये तो सहभागी होऊ शकतो. तो आयपीएल किंवा पीएसएलचा भाग नाही. आयपीएल लिलावात त्याला कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नव्हते.





