Pimpri-Chinchwad : पराभवानंतर शहर भाजपला शिस्तीची आठवण!
Pimpri-Chinchwad : ‘वरातीमागून घोडे’; पदवीधर निवडणुकीच्या पराभवानंतर अनुशासन समितीची घोषणा

पिंपरी – पक्षांतर्गत शिस्त आणि अनुशासन हा भारतीय जनता पक्षाचा अभिमान असल्याचे सांगणाऱ्या शहर भाजपला पदवीधर निवडणुकीतील पराभवानंतर संघटनात्मक शिस्तीची आठवण झाली आहे. निवडणूक पार पडल्यानंतर शहर भाजपने अनुशासन समितीची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातच कार्यकर्त्यांमध्ये शिस्त आणि समन्वय राखण्याची गरज पक्षाला का वाटली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निवडणूक संपल्यानंतर समिती स्थापन करण्याचा निर्णय म्हणजे ‘वरातीमागून घोडे’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
पक्ष संघटना सुरळीत चालावी, संघटनेचा विस्तार व्हावा आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांनी खोट्या बातम्या अथवा प्रचाराला बळी न पडता पक्षाचे काम जोमाने करावे, यासाठी पक्षांतर्गत शिस्त आवश्यक असल्याचे भाजपने म्हटले आहे.
ही शिस्त अधिक बळकट करून पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अनुशासन समितीची घोषणा बुधवारी (दि. २८) करण्यात आली आहे. या समितीमध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते, विधिज्ञ, लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम केलेल्या अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीच अशी यंत्रणा कार्यरत असती, तर कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि पक्षांतर्गत शिस्तीच्या दृष्टीने तिचा उपयोग झाला असता का, याचीही चर्चा होत आहे.
सहा जणांच्या समितीची घोषणा
शहर भाजपच्या अनुशासन समितीमध्ये सदाशिव खाडे, आमदार उमा खापरे, ॲड. मोरेश्वर शेडगे, ॲड. गोरखनाथ झोळ, सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि विकास डोळस यांचा समावेश आहे. पक्षातील शिस्तभंगाच्या बाबींवर लक्ष ठेवणे आणि संघटनात्मक अनुशासन बळकट करण्याच्या उद्देशाने या समितीकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर संघटनेतील शिस्तीचा मुद्दा पुढे आल्याने शहर भाजपच्या संघटनात्मक नियोजनावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.





