Modi kahin nahi jayega : मोदी कहीं नहीं जाएगा.! खर्गेंच्या विधानावर भाजपचा गाण्यातून पलटवार; सोशल मीडियावरील राजकीय संघर्ष तीव्र
भाजप नेते संबित पात्रा, पीयूष गोयल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा त्यात समावेश आहे.

Modi kahin nahi jayega – काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या वादग्रस्त विधानावरून भाजपने सोशल मीडियावर आक्रमक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून भाजपने मोदी कहीं नहीं जाएगा हे गाणे प्रसिद्ध करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांतील पदाधिकाऱ्यांनी एक्स आणि इन्स्टाग्रामवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला. भाजप नेते संबित पात्रा, पीयूष गोयल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांचा त्यात समावेश आहे.
या गाण्यात मोदी यांना जनतेने निवडून दिले असून, ते पदावरून जाणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे. विरोधकांच्या टीकेला मोदी कामातून उत्तर देतात, असे सांगत काँग्रेसवर अपशब्द वापरल्याचा आरोपही गाण्यातून करण्यात आला आहे.
रविवारी पाटणा येथे बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिंह यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात खर्गे यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला. एका उपस्थिताने मोदी कुठेही जाणार नसल्याचे म्हटल्यानंतर खर्गे यांनी मोदींचे वडीलही जातील, असे विधान केले होते.
दरम्यान, काँग्रेसनेही सोशल मीडियावरून भाजपवर हल्लाबोल सुरू ठेवला आहे. राहुल गांधी यांनी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरीचे आरोप केले आहेत. खर्गे यांनीही विविध राज्यांतील सरकारांवर टीका केली आहे.
मतचोरीच्या आरोपांवरून इंडिया आघाडीने १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मोर्चाचे आयोजन केले आहे. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातील विरोधकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय संघर्षाची मालिका सुरू आहे.





