Maharashtra politics : अतिरेकानंतर स्फोट होईल; आमदार बच्चू कडूंची खदखद

मुंबई :- राष्ट्रवादीला सरकारमध्ये घेताना विश्वासात घेतले नाही. सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आल्याने शिंदे गटातील आमदारांची अडचण झाली आहे, अतिरेकानंतर स्फोट होईल, अशी खदखद माजी मंत्री बच्चू कडू यांनी बुधवारी व्यक्त केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेत घेताना त्यांचे मंथन आणि चिंतन व्हायला पाहिजे होते. आम्हाला विचारात आणि विश्वासात न घेता राष्ट्रवादीला सोबत घेतले आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला सरकारमध्ये सोबत घेतल्याने आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची अडचण झाली आहे. कारण मविआ सरकारमध्ये राष्ट्रवादीचा त्रास होता, काम होत नव्हते. शिवसेनेचे मतदार संघ फोडून त्यांच्या मतदारसंघाची बांधणी होत होती, असा आरोप होता.
मात्र त्या आरोपाला आता छेद लावण्याचा प्रयत्न आहे. तर ज्यांनी हा उठाव केला त्यांनीच आपल्या डोक्यावर ही कुऱ्हाड मारून घेऊ नये. त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. सत्तेसाठी काही पण असं होऊ नये, याची आम्हाला अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रियाही आमदार कडू यांनी दिली आहे.
अजित पवार अभिनंदनास पात्र..
राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील बंडावर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. “शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यामुळे या बंडाचं दुःख मोठ आहे. शरद पवार साहेबांना झालेल्या वेदना कमी नाहीत. त्यांचे सांत्वन आम्ही करतो. या उठावाची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. त्यानंतर शिंदे आणि आता अजित पवार यांनी केली आहे. सगळ्या उठावाचे भिष्मपिता शरद पवार आहेत. बंड शरद पवारसाठी नवीन नाही. बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी उचलेल पाऊल अभिनंदनास पात्र आहे,’ असेही बच्चू कडू म्हणाले.





