अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप ; तब्बल २५० लोकांचा मृत्यू, तर शेकडो जण गंभीर जखमी

Afghanistan Earthquake । अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात रविवारी रात्री तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.३ नोंदवण्यात आली. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, भूकंपात २५० लोकांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक जखमी झाले. अफगाणिस्तानसह पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपानंतर लोक अजूनही घाबरले आहेत. रविवारी रात्री १२.४७ वाजता भूकंप झाला, सुरुवातीला ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला आणि त्यानंतर ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. अफगाणिस्तानच्या नांगरहार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रवक्ते नकीबुल्लाह रहीमी यांनी सांगितले की, भूकंपामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तथापि, यानंतर जीव गमावणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आता एकूण २५० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
भूकंपाबद्दल तालिबान प्रवक्त्याने काय म्हटले ?
तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी एक्सपोस्टद्वारे सांगितले की, “दुर्दैवाने, आज रात्री झालेल्या भूकंपामुळे आपल्या काही पूर्वेकडील प्रांतांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. स्थानिक अधिकारी बाधित लोकांच्या बचाव कार्यात गुंतले आहेत. केंद्र आणि जवळच्या प्रांतांमधूनही मदत पथके पोहोचत आहेत.”
Sadly, tonight’s earthquake has caused loss of life and property damage in some of our eastern provinces.
Local officials and residents are currently engaged in rescue efforts for the affected people.
Support teams from the center and nearby provinces are also on their way,— Zabihullah (..ذبـــــیح الله م ) (@Zabehulah_M33) August 31, 2025
अफगाणिस्तानात अनेक वेळा भूकंप
अफगाणिस्तानात यापूर्वीही अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. २८ मे रोजी ४.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. तथापि, कोणतेही नुकसान झाले नव्हते. १६ एप्रिल रोजी ५.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यासोबतच गेल्या काही महिन्यांत भारत, नेपाळ आणि चीनमध्येही भूकंप झाले आहेत.
मैदान शहरच्या माजी महापौर झरिफा घफ्फारी यांनी सोशल मीडियावर म्हटले की, “कुनर, नंगरहार आणि नुरिस्तान प्रांतांमध्ये संपूर्ण गावे जमीनदोस्त झाली आहेत. महिला, मुले, आणि वृद्ध यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तालिबान सरकारकडून योग्य मदत मिळत नसल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित मदतीसाठी पुढे यावे.”
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रहमानुल्ला गुरबाज यांनी मृतांचे खूप दुःख व्यक्त केले. “अफगाणिस्तानातील कुनार येथे झालेल्या दुःखद भूकंपामुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या प्रार्थना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.
याआधी 7 ऑक्टोबर 2023 रोजी आलेल्या भूकंपातही मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यात तालिबान सरकारनुसार 4,000 लोकांचा मृत्यू, तर संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार सुमारे 1,500 मृत्यू झाले होते.





