Pakistan : अफगाणिस्तानमधून डागलेली ड्रोन पाकिस्तानने पाडली
४ ड्रोन तोरखाम सीमेजवळ आणि उर्वरित ४ ड्रोन खैबर पख्तुनख्वा प्रांतात कोहाट भागातल्या पर्वतीय प्रदेशात पडली. ही ड्रोन अफगाणिस्तानमधूनच डागण्यात आली होती.

Pakistan – अफगाणिस्तानमधून डागण्यात आलेली ८ ड्रोन पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी आज पाडली.पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरल्यानंतर ही ड्रोन पाडण्यात आली, असे पाक सुरक्षा दलांनी म्हटले आहे.
यापैकी ४ ड्रोन तोरखाम सीमेजवळ आणि उर्वरित ४ ड्रोन खैबर पख्तुनख्वा प्रांतात कोहाट भागातल्या पर्वतीय प्रदेशात पडली. ही ड्रोन अफगाणिस्तानमधूनच डागण्यात आली होती,या दाव्याचे त्रयस्थ माध्यमांकडून पडताळणी होऊ शकले नाही.
काही ड्रोन हे प्राथमिक स्वरूपाचे मॉडेल होते आणि कोहाटजवळ आढळलेले ड्रोन सॉफ्ट-किल कारवाईद्वारे निकामी करण्यात आले. ड्रोनचा उद्देश सार्वजनिक ठिकाणांना लक्ष्य करण्याचा होता, असा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.
पाकिस्तानविरुद्ध कारवाया करणाऱ्या अतिरेक्यांना अफगाण तालिबानचा पाठिंबा असल्याचा हा आणखी एक पुरावा आहे, असेही पाक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अफगाणि-पाकिस्तान सीमेवर नव्याने संघर्षाची ठिणगी पडल्याच्या पार्श्वभुमीवर ही ड्रोन डागली गेली आहेत. पाकिस्तानच्या हवाई दलाने अलिकडेच अफगाणिस्तानच्या हद्दीत हवाई हल्ला करून २८ दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे.
त्यानंतर पक्तिका आणि नागरहार प्रांतांमधून दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावाही पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता.





