अफगाण कांदा पहिल्यांदाच पुण्याच्या बाजारात; मार्केट यार्डात किलोला मिळाला ४० रुपये भाव

पुणे – मार्केट यार्डात अफगाणिस्तान येथून कांद्याची आवक झाली आहे. अमृतसरमार्गे ही आवक झाली आहे. रंगाने लाल, आकाराने मोठा असलेल्या या कांद्याला हॉटेलसह विविध व्यावसायिकांकडून मागणी आहे. घाऊक बाजारात किलोला ४० रुपये भाव मिळाला.
देशात कांद्याचा तुटवडा आहे. कांद्याचे भाव वाढल्याने ही आवक झाली. मार्केट यार्डातील कांदा विभागातील राम नरवडे यांच्या नरवडे आणि कंपनी येथे १८ टन कांद्याची आवक झाली. शहरासह चाकण भागातील व्यावसायिकांनी या कांद्याची खरेदी केली आहे. मंगळवारी येथील बाजारात ९० ट्रक आवक झाली. यामध्ये ८० ट्र्क नवा कांदा आहे.
नवीन कांद्याची नगर आणि बीड जिल्ह्यांतून आवक होत आहे. लांबलेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. परिणामी, नेहमीच्या तुलनेत कमी आवक होत आहे. घाऊक बाजारात किलोला दर्जानुसार ३५ ते ५० रुपये भाव मिळत आहे. तर साठवणुकीतील जुना कांदा कमी शिल्लक आहे. त्यामुळेआवक कमी होत आहे. मंगळवारी नाशिक जिल्ह्यातून १० ट्रक कांद्याची आवक नोंदविण्यात आली. घाऊक बाजारात किलोला ५० ते ६० रुपये भाव मिळत आहे.
स्थानिक कांद्यावर परिणाम नाही
अफगाणिस्तानचा कांदा केवळ व्यावसायिकांनी खरेदी केला आहे. घरगुती ग्राहकापर्यंत तो पोहोचलेला नाही. नेहमीच्या तुलनेत कांद्याची आवक ३० टक्के कमी होत आहे. त्यामुळे अफगाणिस्तान येथील कांदा आला तरीही स्थानिक कांद्याचे भाव स्थिर असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“हॉटेलसह विविध व्यावसायिकांकडून जुन्या कांद्याला मागणी आहे. जुन्या कांद्याला अफगाणिस्तानचा कांदा पर्याय ठरत आहे. जुन्या कांद्यापेक्षा भाव स्वस्त असल्याने याची खरेदी करण्यात येत आहे.” – राम नरवडे, कांद्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.
“मार्केट यार्डात यापूर्वी इजिप्त, इराण येथील कांद्याची आवक झाली होती. मात्र, अफगाणिस्तानचा कांदा पहिल्यांदाच दाखल झाला आहे. त्याला पसंती मिळत आहे.” बाळासाहेब कोंडे, फळ आणि भाजीपाला विभागप्रमुख, पुणे बाजार समिती.





