Women’s T20 World Cup 2024 : न्यूझीलंड संघाची घोषणा, डिव्हाईनकडे कर्णधारपद..! भारताविरूध्द होणार पहिला सामना…

Women’s T20 World Cup 2024 : महिला टी-20 विश्वचषक 2024 चे यंदा यूएईमध्ये आयोजन केले जात आहे. ज्यामध्ये एकूण 10 संघ सहभागी होत आहेत. या विश्वचषकासाठी न्यूझीलंडच्या महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. सोफी डिव्हाईनकडे (Sophie Devine) संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. डिव्हाईनचा हा शेवटचा टी-20 विश्वचषक असणार आहे.
विशेष म्हणजे, डिव्हाईन हिचा हा 9वा टी-20 विश्वचषक असणार आहे. न्यूझीलंडचा महिला संघ विश्वचषकातील पहिला सामना टीम इंडियाविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 4 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. त्यासाठी न्यूझीलंडने विश्वचषकासाठी आपल्या 15 सदस्यीय खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे.
काय म्हणाली संघाची कर्णधार?
टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जाहीर झाल्यानंतर, न्यूझीलंडसाठी स्पर्धेच्या प्रत्येक हंगामात खेळणाऱ्या डिव्हाईन हिने म्हटले की, “टी-20 विश्वचषक हा महिलांच्या खेळाच्या विकासासाठी आणि वाढीसाठी एक महत्त्वाचे माध्यम आहे आणि मी सुरुवातीपासूनच प्रत्येक स्पर्धेत खेळली आहे ही माझ्यासाठी खरोखरच एक विशेष उपलब्धी आहे.”
न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज रोझमेरी मायरने दुखापतीतून सावरल्यानंतर आता संघात पुनरागमन केले आहे. याशिवाय वरिष्ठ ऑफस्पिनर लेह कॅस्परेकने संघातील स्थान कायम ठेवले आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेदरम्यान तिने वर्षभरानंतर टी-20 संघात पुनरागमन केले. उर्वरित संघ अपेक्षेप्रमाणे आहे, केर भगिनी अष्टपैलू विभागाचे नेतृत्व करतील तर ली ताहुहू वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करेल.
New Zealand name their Women’s #T20WorldCup squad as Sophie Devine leads her country for the final time in the format 👇https://t.co/jkOnMWD2K0
— T20 World Cup (@T20WorldCup) September 10, 2024
न्यूझीलंडचे पूर्ण वेळापत्रक…
न्यूझीलंडचा महिला संघ 16 सप्टेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅके येथे तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी रवाना होणार आहे, ही स्पर्धा विश्वचषक तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. किवींना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे 29 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला दोन सराव सामने खेळायचे आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि पाकिस्तानसह न्यूझीलंडला ‘अ’ गटात ठेवण्यात आले आहे. त्यांना 4 ऑक्टोबरला विश्वचषकात भारताविरुद्ध खेळायचे आहे. यानंतर ते 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध, 12 ऑक्टोबरला श्रीलंका आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामने खेळणार आहेत.
महिला टी-20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ : सोफी डेव्हाईन, सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रूक हॉलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, जेस केर, अमेलिया केर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हन्ना रोवे, ली ताहुहू





