Additional Collector Office: बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापनेस मान्यता; ‘या’ तालुक्यांचा कार्यक्षेत्रात होणार समावेश
Additional Collector Office: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; नवीन रचनेनुसार तालुक्यांची विभागणी जाहीर, पाहा संपूर्ण यादी.

Additional Collector Office – जिल्ह्यात बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे, तसेच या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय खेड तालुक्यात महसूल विभागात वाढलेले कामकाज पाहता या तालुक्यात चाकण येथे अपर तहसील कार्यालय स्थापन होणार असून, त्याचे कार्यक्षेत्र निश्चित केले आहे. पुणे जिल्ह्यात १३ तालुके असून, जिल्ह्याचा भौगोलिक विस्तारही मोठा आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या कामासाठी थेट पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालय गाठावे लागते. जिल्ह्यात जमीनविषयक दावे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून, त्यांची सुनावणी एकाच अधिकाऱ्याकडे होत असल्याने दावे निकाली निघण्यास दोन ते तीन वर्षे लागतात. यामुळे पुणे जिल्ह्यासाठी नव्याने आणखी एक अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्माण करण्यास मान्यता दिली असून, ते बारामती येथे होणार आहे. या दोन्ही कार्यालयांच्या हद्दीबाबत नागरिकांकडून हरकती, सूचना मागविण्यात आल्या आहेत.
दावे लवकर निकाली होण्यासाठी
जमिनीचे अकृषिक परवाने, जमीनविषयक दाव्यांची सुनावणी, गौणखनिज, पुर्नवसन विभाग, कुळकायदा शाखा आदी विभाग हे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. याव्यतिरिक्त सातबारा संगणकीकरण, जिल्हा दौरा, विविध समित्यांच्या बैठकांमुळे जमीनविषयक दाव्यांवर सुनावणी घेऊन त्यावर वेळेत निर्णय देणे शक्य होत नाही. ही सर्व परिस्थिती पाहता नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत, तसेच दावे लवकर निकाली व्हावेत, यासाठीच राज्य शासनाने बारामती येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यालयाचे नाव – कार्यक्षेत्रातील तालुके
1.बारामती अपर जिल्हाधिकारी – बारामती, दौंड, इंदापूर
2.पुणे अपर जिल्हाधिकारी – पुणे शहर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, हवेली, शिरूर, पुरंदर, जुन्नर, भोर, राजगड
कार्यालयाचे नाव – कार्यक्षेत्रातील मंडल कार्यालये
1.चाकण तहसीलदार – चाकण, आळंदी, पिंपळगाव ता. खेड, करंजविहिरे
2.खेड तहसीलदार – राजगुरूनगर, वेताळे, कडूस, कन्हेरसर, पाईट, वाडा, कुडे बु.





