Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा हिचा अपघात; गंभीर दुखापतीनंतर रुग्णालयात दाखल, परदेशातील मुक्काम वाढवला!
या दुर्घटनेत तिला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दुखापतीनंतर तिला बालीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुच्चाबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. कामानिमित्त बालीमध्ये गेलेल्या नुसरतचा तिथे अपघात झाला असून, या दुर्घटनेत तिला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. दुखापतीनंतर तिला बालीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
विशेष म्हणजे, अपघातामुळे नुसरतला बालीतील आपला मुक्काम वाढवावा लागला आहे. मात्र, तिला नेमकी कोणती दुखापत झाली आणि अपघात किती गंभीर होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
NDTVच्या वृत्तानुसार, नुसरत भरुच्चा एका कामाच्या निमित्ताने बालीला गेली होती. याच प्रवासादरम्यान तिचा अपघात झाला. दुखापत झाल्यानंतर तिला वैद्यकीय उपचारांची गरज भासली आणि त्यामुळे तिचा बालीतील मुक्काम पुढे वाढवण्यात आला.
विशेष म्हणजे, अपघाताच्या काही दिवस आधीच नुसरतने बालीमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे ती बालीमध्ये असल्याचं तिच्या चाहत्यांना तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून समजलं होतं.
टायगर श्रॉफसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार
दरम्यान, नुसरत भरुच्चा सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समुळेही चर्चेत आहे. तिने अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी अॅक्शनपटात एंट्री केली आहे. दिग्दर्शक रेमो डिसूझा यांच्या या अद्याप शीर्षक निश्चित न झालेल्या सिनेमात नुसरत आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.
नुसरत यापूर्वीही शूटिंगदरम्यान झाली होती जखमी…
नुसरत भरुच्चासाठी शूटिंगदरम्यान जखमी होण्याची ही पहिलीच घटना नाही. 2023 मध्ये ‘अकेली’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका सीनमध्ये धावताना ती संगमरवरी फरशीवर पडली होती. या अपघातानंतर तिला काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला होता.
याच वर्षी ‘छोरी 2’च्या शूटिंगदरम्यान एका अॅक्शन सीनमध्येही नुसरतच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर आणि भुवयांवर टाके घालावे लागल्याचं त्यावेळी वृत्त होतं.
तसेच ऑगस्ट 2021 मध्येही सततच्या शूटिंगमुळे नुसरतची तब्येत अचानक बिघडली होती. अनेक दिवस सलग काम केल्यानंतर तिला चक्कर येऊ लागली होती आणि तिला नीट उभं राहणं किंवा बोलणंही कठीण झाल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं.
त्यानंतर तिला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर डॉक्टरांनी तिला काही दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला होता.






