पुण्यातील वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपींवर मोक्कांतर्गत कारवाई

पुणे : शिक्षणाचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यात मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. ड्रग्ज, हत्या, गोळीबाराच्या घटनांनी पुणे हादरून गेले आहे. या घटनांमुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी पुण्यात माजी नगरसेवकाचा भररस्त्यात खून करण्यात आला होता. या प्रकरणात आता एक मोठी अपडेट आली आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून एकूण 22 आरोपींवर पुणे पोलिसांकडून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज सूर्यकांत आंदेकर (वय 40) यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
काय घडले होते नेमके?
पुण्यातील नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोरांनी दुचाकीवर येऊन चौकात मित्रासोबत उभे असलेल्या वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. यावेळी, थेट वनराज यांच्या अंगावर धावून जात आरोपींनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र, गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यातच वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घरगुती संपत्तीच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे सूर्यकांत आंदेकर बहिणींनी आणि त्याच्या मेहुण्यांनी हत्या केल्याचे समोर आले.





