पिंपरी | पालिकेकडून हॉटेल, पब, बरवर धडक कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील बेकायदेशीर हॉटेल, बार, पबवर महापालिकेने धडक कारवाईचे सत्र सुरु केले आहे. शहरातील ९० हॉटेल, बार, पबमध्ये वाढीव बांधकाम केल्याचे समोर आले आहे. वाल्हेकरवाडी, रावेत भागातील अशा सात हॉटेलवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे.
पुण्यातील कल्यानीनगर पोर्शे कार अपघातानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल, बार, पबच्या अनधिकृत बांधकामांसह त्यांचा अनियमिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठ्या प्रमाणात पब, हॉटेल, बारवर कारवाई सुरु केली आहे. शहरातील सात हॉटेलवर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करुन बांधकाम जमीनदोस्त केले आहे.
शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि इतर व्यावसायिक इमारतींची संख्या मोठी आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जात असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट तसेच इतर व्यावसायिक इमारतींचे संबंधित व्यवसाय मालकांनी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करणे बंधनकारक आहे.
हॉटेल, पब, बारवर इमारतीत मंजूर बांधकामांपेक्षा अधिक बांधकाम, प्रत्यक्षात जागेच्या वापरात बदल, अशा प्रकारची अनियमितता आढळून आली.
त्यावर पालिकेने शहरातील सर्व हॉटेल्स, बार, रेस्टॉरंटचे सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात दोषी आढळलेल्या आस्थापनांवर पालिकेने कठोर कारवाई सुरु केली आहे. हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट येथे बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्याने त्यांच्या परवानग्या रद्द करण्यात येणार आहेत.
पालिकेने रावेत, वाल्हेकरवाडी येथील पवना नदीच्या पुररेषेत बांधलेल्या आणि अवैध धंदे करणाऱ्या टॉप ८७ हॉटेलला नोटीस देवून चोवीस तासात संपुर्ण हॉटेल जमीनदोस्त केले.
वाल्हेकरवाडी येथील जगदंब हॉटेल, गुणाजी ढाबा, शिवराज हॉटेल, जय मल्हार हॉटेल, मराठा पॅलेस हॉटेल, गावकरी थाट या सात हॉटेलवर कारवाई केली. तर, रावेतमधील हॉटेल न्यू दिल्ली दरबार, हॉटेल भोंडवे मळा आणि हॉटेल गाव चावडी या तीन हॉटेलवर कारवाई करण्यात येणार आहे.
अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घ्या, अन्यथा कारवाई
महापालिका हद्दीतील अनधिकृत असलेल्या रावेत व वाल्हेकरवाडी येथील सात हॉटेलवर कारवाई केली. आणखी तीन हॉटेलवर कारवाई करण्यात येणार आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ आणि अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घ्यावे. अतिक्रमण केलेल्या हॉटेलला नोटीस बजावण्यात आल्या असून लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त मनोज लोणकर यांनी दिली.





