स्वित्झर्लंड हादरलं.! नववर्षाच्या सेलिब्रेशनवर काळाचा घाला; भीषण आगीत १० जणांचा मृत्यू, १०० जखमी

Le Constellation । Berlin/Switzerland : स्वित्झर्लंडमधील स्विस आल्प्स डोंगररांगांमध्ये असलेल्या एका प्रसिद्ध स्की रिसॉर्टमध्ये नववर्षाच्या जल्लोषाला भीषण आगीचे ग्रहण लागले. क्रान्स-मोंटाना नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या एका बारमध्ये बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. गुरुवारी स्थानिक पोलिसांनी या घटनेची अधिकृत माहिती दिली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, स्विस आल्प्सच्या मध्यभागी असलेल्या ‘ले कॉन्स्टेलेशन’ (Le Constellation) या नामांकित बारमध्ये बुधवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी या ठिकाणी १०० हून अधिक पर्यटक उपस्थित होते. अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीत एकच धावपळ उडाली. या दुर्घटनेत ८ ते १० जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
View this post on Instagram
पोलीस प्रवक्ते गॅटन लॅथियन यांनी सांगितले की, “आम्ही सध्या तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आहोत. हे एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे प्रसिद्ध स्की रिसॉर्ट असल्याने येथे मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येतात. जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत केंद्र आणि हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.”
पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न :
क्रान्स-मोंटाना हे ठिकाण प्रसिद्ध मॅटरहॉर्न पर्वतापासून अवघ्या ४० किमी अंतरावर आहे. पर्यटनासाठी जागतिक नकाशावर असलेल्या या ठिकाणी घडलेल्या भीषण घटनेमुळे संपूर्ण स्वित्झर्लंडमध्ये शोककळा पसरली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, स्थानिक प्रशासन अधिक तपास करत आहे.





