काँग्रेसच्या सांगण्यावरून कंगनावर कारवाई -प्रज्ञासिंह ठाकूर

नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकिस्तानव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर राज्यसह देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. या वादातानंतर कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगपालिकेडून कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर भाजप नेत्यांनीदेखील कंगनाला पाठिंबा दिला.या वादात खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांनीदेखील उडी घेतली आहे.
कंगनाचे समर्थन करत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महाराष्ट्र सरकारवर आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरदेखील टीका केली आहे. काँग्रेस पक्षाच्या इशाऱ्यावरून कंगाना विरोधात कारवाई केली जात आहे असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं. यावेळी, पोलीस आयुक्त परमबीर सिंह कोणालाही न्याय मिळवून देऊ शकत नाही आणि जर कोणी त्याच्यावर आरोप केले असतील तर ते खरे आहेत. त्यांनी माझ्यावरही अन्याय केला आहे” असे ठाकूर यांनी सांगितले.
आता शिवसेना काँग्रेस पक्षाबरोबर आहे आणि कदाचित त्याच्यामुळे काँग्रेसचा प्रभाव त्यांच्यावर आहे. म्हणून काँग्रेसने शिवसेनेला त्यांच्या प्रभावखाली काम करण्यास भाग पाडले असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील गृहखाते हे काँग्रेस पक्षाकडे आहे त्यामुळे कंगना विरोधात कारवाई करण्यात आली असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.
दरम्यान, ठाकूर यांनी शिवसेनेविषयी सौम्य भूमिका मांडली. २००८ मध्ये अडचणीत असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय कोणताही पक्ष माझ्या पाठीशी नव्हता असेही त्या म्हणाल्या. बाळासाहेब ठाकरेंनी मालेगाव मालेगाव स्फोटातील ठाकूर यांच्यासह इतर आरोपींचे समर्थन केले होते. याआधी उमा भारती यांनी देखील कंगनाला पाठिंबा दिला होता. कंगनावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने राज्य सरकारच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आली असे त्या म्हणाल्या.





