नितीन कामथ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई; नेमकं काय घडलं?

Zerodha Nithin Kamath | ऑनलाईन शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म झिरोधावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून कारवाई केली आहे. निर्धारित वेळेत मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) नियुक्त करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल मंत्रालयाने झिरोधा कंपनीतील सर्व संचालकांना दंड ठोठावला आहे. त्यामुळे नितीन कामथ यांच्यासह इतरांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे.
का करण्यात आली कारवाई?
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने 31 जुलै रोजी हा आदेश जारी केला आहे. यानुसार, झिरोधा एएमसीने कंपनी कायदा, 2013 च्या कलम 203 चे उल्लंघन केले आहे. या अंतर्गत 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त भरलेले भांडवल असलेल्या कंपन्यांना सीएफओ पदावर कायमस्वरूपी नियुक्ती करणे आवश्यक आहे. पण, कंपनी सीएफओशिवाय काम करत होती.
किती ठोठावण्यात आला दंड ?
कंपनी नियामकाने झिरोधा एएमसीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे आदेशात म्हटले आहे. याशिवाय कंपनीचे संस्थापक नितीन कामथ यांना 4.08 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. याशिवाय राजण्णा भुवनेश यांना 5 लाख, विशाल वीरेंद्र जैन यांना 3.45 लाख, कंपनी सचिव शिखा सिंग यांना 3.45 लाख, नित्या ईश्वरन यांना दीड लाख आणि तुषार महाजन यांना दीड लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. झिरोदा आणि त्याच्या अधिकाऱ्यांना दंड भरण्यासाठी 90 दिवसांची मुदत दिली असून कंपनीचे संचालक स्वत:च्या पैशातून दंड भरतील, असे आदेशात सांगण्यात आले आहे.
तब्बल 459 दिवस रिकामं होतं पद
झिरोदा एएमसीनं मार्च 2023 मध्ये चिंतन भट्ट यांची कंपनीचे सीएफओ म्हणून नियुक्ती केली होती. त्यापूर्वी त्या पदी कोणाचीही नियुक्ती नव्हती. या दिरंगाईमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मंत्रालयाने आदेशात म्हटले की, कंपनीचे सीएफओ पद 20 डिसेंबर 2021 ते 23 मार्च 2023 पर्यंत 459 दिवस रिक्त होतं.
हेही वाचा:
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात NDA चे नुकसान का झाले? ; आता अजित पवारांनी सांगितले कारण





