‘… तर पुन्हा 2008 सारखी स्थिती निर्माण होऊ शकते’, शेअर बाजारात घसरण सुरू असताना झिरोधाच्या सह-संस्थापकांनी व्यक्त केली भीती

Share Market News | गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामथ यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. जर बाजारात आणखी मोठी घसरण झाली, तर किरकोळ गुंतवणूकदार पुन्हा एकदा अनेक वर्षे इक्विटीपासून दूर जाऊ शकतात. पुन्हा एकदा 2008 च्या आर्थिक संकटासारखे घडू शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले की, “गेल्या पाच वर्षांत एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांनी सातत्याने शेअर बाजारात निव्वळ खरेदी केली. पण सध्याच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आता ते घसरणीनंतर खरेदी सुरू ठेवतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.”
कामथ यांनी पुढे लिहिले की, जर सध्याची अस्थिरता कायम राहिली तर किरकोळ गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास ढासळेल, आणि ते शेअर बाजारापासून अनेक वर्षांसाठी दूर राहतील, जसे की 2008 च्या घसरणीनंतर झाले होते.
By the way, if markets fall sharply, investors might stay out of the market for years—just like they did after 2008. 2/2 pic.twitter.com/PWv4PVMyzb
— Nithin Kamath (@Nithin0dha) April 8, 2025
जानेवारी ते ऑक्टोबर 2008 दरम्यान भारतीय बाजारात 60% पेक्षा जास्त घसरण पाहायला मिळाली होती. त्यावेळी सेन्सेक्स 21,206 वरून थेट 8,160 पर्यंत कोसळला होता. त्यावेळी अनेक गुंतवणूकदारांचे पोर्टफोलिओ 30% पेक्षा अधिक घसरले, ज्यामुळे अनेकांनी शेअर बाजारातून माघार घेतली होती. कामथ यांनी पुन्हा एकदा असेच घडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ वॉर’ मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे बाजारात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय बाजारात देखील चढउतार पाहायला मिळत आहे. अवघ्या 5 दिवसातच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे 24 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.





