‘हे असेच सुरू राहिले तर…’, शेअर बाजारातील घसरण पाहून झिरोधाच्या सह-संस्थापकाने व्यक्त केली ‘ही’ चिंता

Share Market | भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण सुरू आहे. शुक्रवारी (28 फेब्रुवारी) बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 8.82 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 1,420 अंकांनी घसरून 73,192.35 वर बंद झाला. निफ्टीही 418 अंकांनी किंवा 1.86 टक्क्यांनी घसरला आणि 22,126.35 च्या पातळीवर बंद झाला. आता या घसरणीवर झिरोधाचे सह-संस्थापक नितिन कामत यांनी भाष्य केले आहे. कामत यांनी ब्रोकिंग इंडस्ट्रीवर होणाऱ्या याच्या गंभीर परिणामाबाबत मत व्यक्त केले आहे.
शेअर बाजारातील संकटामुळे ब्रोक्रिंग इंडस्ट्रीमधील ट्रेडिंग वॉल्यूम 30 टक्क्यांनी खाली आले आहे. मागील 15 वर्षात पहिल्यांदाच अशा प्रकारची घसरण दिसून येत आहे, असे मत कामत यांनी व्यक्त केले.
नितिन कामत म्हणाले की, बाजार अखेर सुधारणा करत आहेत. बाजारात नेहमी टोकाचे चढ-उतार दिसून येतात. जेवढी तेजी पाहायला मिळते, तेवढेच ते आणखी खाली जाऊ शकते.
The markets are finally correcting. Given that markets swing between extremes, they can fall more just like they rose to the peak.
I’ve no idea where the markets go from here, but I can tell you about the broking industry. We are seeing a massive drop in terms of both the number… pic.twitter.com/wHO6hSRdbA
— Nithin Kamath (@Nithin0dha) February 28, 2025
‘मला कल्पना नाही की बाजार इथून कुठे जाईल, पण ब्रोकिंग इंडस्ट्रीबद्दल मी नक्की सांगू शकतो. ट्रेडर्सची संख्या आणि ट्रेडिंग वॉल्यूम दोन्ही मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. सर्व ब्रोकर्समध्ये मिळून वॉल्यूममध्ये 30% पेक्षा जास्त घट झाली आहे. गेल्या 15 वर्षांत प्रथमच एवढी घट दिसत आहे. वॉल्यूम कमी होत असल्याने भारतीय बाजार अजूनही 1-2 कोटी लोकांपर्यंतच मर्यादित असल्याचे स्पष्ट होते. ’, असे ते म्हणाले.
सरकारला मिळणाऱ्या सिक्योरिटीज ट्रँझॅक्शन टॅक्सबाबतही (STT) त्यांनी भाष्य केले. ‘जर हे असेच चालू राहिले, तर सरकारला आर्थिक वर्ष 25-26 मध्ये STT मधून 40,000 कोटी रुपये देखील मिळणार नाहीत. हा आकडा 80,000 कोटींच्या अंदाजाच्या किमान 50% खाली असेल.’, असे ते म्हणाले.
दरम्यान, भारतीय बाजारात गेल्याकाही महिन्यांपासून प्रचंड घसरण दिसून येत आहे. निफ्टीने घसरणीचा 29 वर्षांचा नवा विक्रम केला आहे. 1996 नंतर निफ्टी सलग 5व्या महिन्यात घसरणीने बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही आज 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.





