नारायणगाव : नारायणगाव शहराने विकासाची नवी कात टाकली असली तरी वाढत्या अतिक्रमणामुळे शहरातील प्रमुख रस्ते अरुंद होत चालले आहेत. बसस्थानकापासून पूर्ववेस, पश्चिम वेस, मुख्य बाजारपेठ, पूर्ववेशीपासून श्री मुक्ताई मंदिरापर्यंत तसेच जुन्नरकडे जाणारा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला असून सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील जुन्नर- मढ मार्गावरील अतिक्रमण करणाऱ्या तब्बल २५ व्यवसायिकांना विभागाकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटिशीत अतिक्रमण स्वखर्चाने हटविण्याच्या सूचना करण्यात आल्या असून दोन दिवसांत अतिक्रमण काढण्यास सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग अतिक्रमण हटविण्याबाबत गंभीर आहे की, केवळ औपचारिकता पूर्ण करत आहे, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघाताचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी ठोस कारवाई करून रस्ते मोकळे करणार की तडजोडीच्या भूमिकेत राहणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. “बंदोबस्तासाठी पोलीस तयार” ग्रामपंचायत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्यास आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार असल्याचे नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे यांनी स्पष्ट केले. पूर्ववेस ते मुक्ताई मंदिरापर्यंत पायी चालणे कठीण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पूर्ववेशीपासून श्री मुक्ताई मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर भाजीविक्रेत्यांनी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण केल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. काही भाजीविक्रेत्यांना गाळे उपलब्ध करून दिलेले असतानाही अनेक विक्रेते गाळ्यांमध्ये व्यवसाय न करता कायमस्वरूपी रस्त्यावरच टेबल टॉप उभारून विक्री करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नागरिकांना पायी चालण्यासाठीही जागा उरलेली नसून वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. स्थानिक प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक न करता रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पूर्ववेशीपासून मुक्ताई मंदिरापर्यंत भाजीविक्रेते रस्त्यावर गर्दी करत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरच भाजी विक्रेत्यांना मार्किंग करून दिले जाईल. त्यानंतर नियमांचे पालन न करणाऱ्या भाजीविक्रेत्यावर रीतसर कारवाई करण्यात येईल. – योगेश पाटे, उपसरपंच हेही वाचा : Vishwajeet Kadam : राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली; डॉ. विश्वजित कदम यांची टीका