Vishwajeet Kadam : राज्यात गुन्हेगारी वाढत असून महिला, लहान मुलींवर अत्याचार होत आहेत. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याची टीका काँग्रेसचे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली. काँग्रेस भवनमधील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, अनेक गुन्ह्यांबाबत जलदगती न्यायालयाची फक्त घोषणाच झाली, त्यातील किती घटनांमध्ये न्याय मिळाला हा प्रश्न आहे. राज्य सरकार झोपले आहे की जागे आहे, हेच समजत नाही. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे ही गृहमंत्रालयाची जबाबदारी असते आणि गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत.महागाई, रस्त्यांची दुरावस्था, पाणीटंचाई, बेरोजगारी, कंत्राटदारांची थकलेली देणी, शेतकरी वर्गाच्या समस्यांमुळे जनता बेजार आहेत. राज्य शासन त्याकडे दुर्लक्ष करत राजकारणात मग्न आहे. आखातातील युद्धस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलवर परिणाम होणार असल्याची केंद्राला कल्पना होती. त्याकडे लक्ष देता सरकार पाच राज्यांतील निवडणुकांमध्येच मग्न होते. कोणत्याही उपाययोजना न करताच निवडणुकांच्या मतदानानंतर अवघ्या ४८ तासातच इंधनाचे दर वाढविण्यात आले. आधीच महागाईने होरपळलेल्या जनतेच्या अडचणीत भरच पडली आहे. काँग्रेसचे लोकप्रतिनिधी विविध सभागृहात याविरोधात आवाज उठवत असून सरकारला जाब विचारत आहेत. शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, वाढते प्रदूषण, पाणीपुरवठ्यातील असमानता हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचेच पाप आहे, असे सांगून ते म्हणाले, पुणेकरांचे हे प्रश्न मांडून त्यासाठी लढण्याचे व त्यातून त्यांची सुटका करण्याचे काम काँग्रेस करणार आहे. नीट पेपरफुटीला केंद्र जबाबदार नीट या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटीला केंद्र शासनच जबाबदार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नीटचे पेपर फुटल्याने लाखो विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई झाली पाहिजे. यापुढे कोणताही पेपर फुटणार नाही, याची काळजी केंद्राने घ्यावी अशी मागणी कदम यांनी केली.